[ १८२ ] श्रीराम. ५ ऑक्टोबर १७४८.
श्रीमंतजीचे सेवेसी विनति ऐसीजेः-
पूर्वी आपाजी मलकोजी जासूद याजबरोबर पत्र लिहिलें आहे कीं, पाच हजार स्वारींची बेगमी येथें केली आहे. जमातदारांचीं नांवें पूर्वी लिहिली आहेत त्यावरून कळों आलें असेल सांप्रत आपाजी वगैरे जासुदांस दोन महिने जाले, न आले. ह्मणून वसवास झाला कीं, मार्गी नदीनाला व चोर वगैरे कांहीं उपद्रव जाला. मारले गेले ह्मणून येमाजी रंगोजी जोडी पाठविणें अगत्य जालें. स्वामीस या कार्याची उभारणी करणे अगत्य असलें तरी उत्तर तैसेच लिहावें आणि जमातदार यांचे वकील हजर आहेत. त्यांचे नांवे कौल पाठविणें. हकीमबेग जमातदार राऊत ५०० व खोजे रहमतुला जमादार ५०० व सिदोजी जलगांऊकर पाटील ५०० व भीमसेन हजारी १००० व खानदेशचे जमातदार नामीबचुमिया व चांदसाहेब व अलीसाहेब फारोखी दखनी १५०० राऊत चांगले नामांकित तजवीज केले आहेत. यांचे नांवें कौल आधीं अलाहिदे पाठविले पाहिजेत कीं, ते चांगले घोडे व राऊत करतील. अथवा हें कार्य करणें नाहीं, तरी खरें उत्तर साफ पाठवणें कीं, आपण या कामापासून दूर आहों. हात उचलून एक वरीस जालें कीं, या कामांत आपण श्रम करितों आणि हा कालपर्यंत जाबसालच पुरता नाहीं. मग काम कधी होणार ? स्वामीचा दरबार एकवचनी थोर ह्मणून श्रम केले. दिसोन आलें कीं, श्रम साध्य नाहीं नस्ता सर्व अमीर व मुत्सद्दियामधें लटिका वाद आला. नित्य थोर लोकाशीं मिथ्या किती बोलावें. व दरबार मोंगलाई आहे येथें एक वेळ लटकें पडलें ह्मणजे मनुष्यास पुन्हा जवळ उभें राहूं देत नाहींत. येथील रव या प्रकारचा. स्वामीकडील उत्तर निर्मळ येत नाही मध्यस्थानें कोठपावेतो मिथ्या भाषण करावें ? हें कर्म कार्याचें नाहीं. देखत पत्र कर्तव्य असले तरी सरंजाम लिहिलेप्रमाणें पाठविणें. कर्तव्य नाहीं तरी उत्तर साफ व गगाजी संकपाळ यास अतिसत्वर जासुदाबरोबर पाठवणें. विलंब करावयाचें कार्य नाहीं. स्वामी समर्थ व सुज्ञाप्रति विशेष लिहिणें नलगे. हे विनति.
पेशवियांचे व यांचें चित्त शुद्ध नाहीं चपाषष्टी जाहलियावरी यांचा त्यांचा हर्षामर्ष होऊन युद्धप्रसंग होणार. ऐसियामधे जमलें तरी चित्तानुरूप कार्य होईल तेथें फौजेचा सरंजाम होत नसला तरी राजश्री शिवरामपंतास एक हजार स्वार समागमे देऊन काहीं खर्च देऊन पाठविजे येथे जुळू मुलाजमत करवून मग राजश्री कृष्णराऊजीस बोलाविलें जाईल सरंजामही होऊन येईल. जागिराचें काम फत्ते केलें जाईल विनति अडिच शेर गहू व अर्धा तूर १ रुपयाचे जासुदाबरोबर पाठविजे.
विनंति.