[ १८१ ] श्री. ५ ऑक्टोबर १७४८.
श्रीमंत राजश्री भगवतराऊजी सा। सेवेसीः-
विनंति सेवक नारो महादेव मुक्काम शहर अवरंगाबाद साष्टांग नमस्कार विनति उपरि येथील कुशल ता। छ २२ सवाल पावेतों स्वामीच्या कृपेकरून यथास्थित असे. विशेष. बहुत दिवस जाले महाराजाकडील काही वर्तमान कळों आलें नाहीं. त्यावरून चित्त उद्विग्न आहे. विशेष. आपाजी व मलकोजी हरकारे जोडी १ नबाब साहेबांचा इनायतनामा व पत्रें देऊन पाठविला. त्यासी आज सवा महिना जाला. परंतु सेवेसी पावला किंवा मार्गी नदींत बुडाले हें नकळे. येथें तों आपणास रोज उठोन ताकीद करितात जे, मा। रा। राऊजी आले किंवा नाहींत. ऐसा विचार येथें आहे. आणि स्वामीस तों या गोष्टीचें स्मरणही नसेल, ऐसें दिसोन येतें येथे नबाब नासरजंग यांचा इनायतनामा तयार होऊन पडला आहे. परंतु महाराजाकडील कांहीं वर्तमानच कळो येत नाहीं, त्यासी आपण काय करावें ? आपणास पूर्वीच कळतें जे, हा कारभार अवघा सत्यच आहे, तरी आपण या कर्मांत न पडतों. परंतु गंगाजी संकपाळ याने कितीएक प्रकारें आह्मांसी आणशपथ केली. आणि आपणही पूर्वीपासून जाणतों जे, स्वामीचा दरबार एकवचनी. ऐसें जाणोन आपण या कामांत आलों नाही, तरी आपण कांहीं उपाशीं मरत नव्हतों. तुमचे कृपेकरून सर्व अनुकूल होतें. परंतु हे कर्म अवलंबियाने इतकें जालें जे, दहा मुत्सद्दियांत लटिका वाद आला, आणि साउकारियांत पत खोटी दिसोन आली ! हें मिळविलें ऐसें जाले ! त्यासी, आपण इतकें उपरोधून लिहितों. परंतु येथें लहानथोर अंमलदार कुल जमा जाले आहेत आणि नबाबसाहेबीं दोन चार वेळां स्मरण केलें जे, राजश्री राऊजी अद्याप न आले, नबाब कुच करोन काळ्या चौत्रियावर डेरे जाले आहेत. दिपवाली जालिया भागानगराकडे जायाचा निश्चय आहे. यावर न कळे जर आपल्या चित्तांत हें कार्य कर्तव्य असलें तरी काहीं खर्चास व कोणी इतबारी पाठविजे. सर्व मनोदयाप्रमाणें घडोन येईल. नाहीं तरी तैसेचि उत्तर पाठविजे. त्यावरोन नबाब साहेबास अर्जी देऊजे. ते येत नाहींत. येथे जागिराची फर्द लिहून द्यावी, तरी आपणापाशीं मोहरही नाहीं, आणि तुमचाही कांही आश्रय दिसोन येत नाहीं. याकरितां आपण कांहीं बोली केली नाहीं. दिल्लीचे वर्तमान तर, पातशहा आगरियास आले यासीही फर्मान आला आहे याकरितां यांनीही कुच केलें आहे ऐसियांत आलिया उत्तम आहे सर्व मनोदयाप्रमाणे घडोन येईल यावर स्वामी समर्थ आहेत तरी कृपा करोन गंगाजी संकपाळ यासी येथवर पाठविजे आपला जिमा साख्त करोन जाईल. नबाब नासरजंग यांचा इनायतनामा पाठवावा तरी साउकराचे घरी आहे विना त्याचा पैका दिलियावेगळा हातास येत नाही आपणाकडील तो पैसा एक दृष्टीस पडत नाहीं याकरिता साउकारास खरेंपण वाटत नाहीं यमाजी हरकारे दोघे पाठविले आहेत. यासी अजुरा रुपये २२ देणे, अत पर उत्तर आलिया मनुष्य पाठविणार नाहीं स्वामीस कार्य कर्तव्य नाहीं आणि आपण नाहाक श्रम करावे, यांत जीव नाहीं. तरी गंगाजीस पाठविजे कृपालोभ असो दीजे. हे विज्ञप्ति. यमाजीस अजुरा रुपये २२ त्यापैकीं येथे दिले रुपये ६, बाकी देणे रुपये १६. हे विनंति. सांप्रत वर्तमान दाभाडे याचीं वस्त्रें व घोडे २ व नजर ५०० मोहरा आल्यात. व राणा उदेपूरकर व सवाई जेसिग याची वस्त्रे वगैरे नबाबसाहेबांस आलीत हुजुरून एक फर्मान पहिले आला होता. साप्रत फर्मान व हत्ती एक व पांच घोडे व कलगी व सिरपेच व मोतियांची माळ व स्त्रें व तरवार आली बदस्तुर साबिला मोठे नबाब हे बहाल जाले. यामुळें नबाब नासरजंग बहुत खुशवखत आहेत. या खुशबखतीमध्यें स्वामीचे स्मरण जालें लहान थोर अमिरांस कळों आलें कीं, राऊ येथे येतात. राजश्री प्रधान यांसही परस्परें श्रुत जाले कीं, राऊनींही या दरबारांत परिश्रम केला नबाबांनी बहुत चहा करोन बोलाविलें आहे, ऐसें जनामध्यें प्रसिद्ध जालें आणि स्वामीकडील वर्तमान, गंगाजी संकपाळ गेलियासी पांच महिने होत आले, आणि आपाजी व मलकोजी जासूद जोडी गेलियास आज दोन महिने जाले, अद्याप कोणी फिरत नाहीं स्वामी सरदार व मनसुबा उमदा जाणून या कार्यांत आलों तेथें मनसुबा उत्तम दिसोन येत नाहीं. याचा भावगर्भ काय तो न कळे. पत्रें येथून वर्तमान सर्व लिहून सेवेसी पाठवितो आपले दृष्टीस स्वामी अवलोकितात कीं नाहीं, हेंही कळत नाही. थोरपणास लौकिक राहे, आणि श्रीमंत कैलासवासी यांच्या नावापरीस विशेष. कीर्ति होय, जनामध्ये हासे न होय, तें केलें पाहिजे. स्वामीचे नांवास दहा वीस हजार रुपये खर्च जाले. ते बहुत नाहींत काम थोर आहे. न जाणो आपण काय तजविजीमध्यें आहेत. आपलें नेत्र अहर्निस तिकडे लागून राहिले आहेत. तेथे दरबारांत ज्या थोर लोकाचे विद्यमाने कार्याची उभारणी केली आङे, त्यांचीं माणसे नित्य येऊन शरमिंदे करितात. नजरबेगखांजी नित्य ह्मणतात कीं, ऐसें न करणे कीं, मजवरी शब्द ये माझें कार्य नासलें नवे दिगर जाले तरी मजवरी इतराज होतील, कीं लटिका मनसुबा तुमचा आहे ऐसें वर्तमान येथील आहे स्वामीस आपल्या नावासारखें कर्तव्य तरी दोन्ही इनायतनामियांचा खर्च रुपये सा हजार व वस्त्रें वगैरे सरजाम पाठवून देणें कार्याची तरतूद केली जाईल कर्तव्य नसले तरी स्पष्ट उत्तर लिहावें, की आह्मांस कर्तव्य नाही आणि गंगाजीस अतिसत्वर पाठवणें, की आह्मांस साउकारापासून मुक्त करून जाई बहुत काय लिहिणें. हे विनंति.