[ १७५ ] श्री. ६ जून १७४८.
राजमान्य राजश्री राऊसाहेब भगवंतरायजी स्वामीचे सेवेसीः -अखंडलक्ष्मीसुप्रसन्न राजमुद्राविराजित स्ने।। गंगाजी संकपाळ, मुकाम शहर अवरंगाबाद विनंति उपरि येथील कुशल छ २० जमादिलाखर जाणून निजानंदलेखन सदैव इच्छितो. विशेष. अजूरदार कासद व रायाजी व सिदोजी जासुदांबरोबर पत्रें व खलित्या व लखोटे पाठविले, ते शहरीं प्रविष्ट जाले. येथील वर्तमान सर्व राजश्री नारो महादेव यांचें पत्रीं लिहिलें आहे, त्यावरून कळों येईल. येथें कार्याची उभारणी करावयासी आळस केला नाहीं. अगत्य जाहलें, ह्मणून अजूरदार कासद सेवेसी पाठविला. त्यासी उत्तर साफ आलें. येथें पैसा मिळत नाहीं, ह्मणून पत्रीं लिहिलें होतें. आणि उत्तरें ऐसीं आलीं. ऐसियासि, आपला इलाज काय ? सर्व रायाजी व सिदोजी रोबरो पाहून आले आहेत, निवेदन करितील. तें ध्यानास आणून साहित्य येऊन पोहोचत आहे, तरी सर्वही होऊन येतें. याहीवरी सरदार आहेत! सांप्रत साउकारांस रोखा राजश्री नारो महादेव याणीं दिधला आहे. त्यास तकाजा बहुत आहे. त्याचें साहित्य होऊन येईल, तरी उत्तम आहे. साहेबीं वचन इमानप्रमाण घेतले ह्मणून हें कार्य करणें आलें. अभिमान सर्व साहेबांस आहे. अभिमानपूर्वक साहित्य प्रविष्ट जालिया यशकीर्ति स्वामीची आहे आणि साहेबाचेंहि कार्य थोर होऊन येतें कळलें पाहिजे. विशेष काय लिहिणें हे विनंति.