[ १७३ ] ।। श्रीरामचंद्राय नम: ।। ६ जून १७४८.
पंत स्वामी प्रतिनिधि.
श्रीरघुराजचरणसेवातत्पर श्रीमंत राजमान्य राजश्री भगवंतराऊ स्वामीचे सेवेसीः -
आज्ञाधारक नारो महादेव कृतोनक साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल छ २० माहे जमादिलाखर जाणून निजानंदवैभव सदैव इच्छितों. विशेष. राजश्री गंगाजी संकपाळ स्वामीचीं पत्रें नबाबसाहेबांकडे घेऊन आलेत. मशानरइलेही दरबारांत जो तलाश करावयाचा तो केला. परंतु अर्जी मुख्यास गुजरणावयासी कोण्हीं साह्यता न केली. दरबार थोर. बावीस सुभे हिंदुस्थान व सा सुभे दक्षण, अठाविस सुभियांचें काम या गृहांमध्यें आलें आहे ।।। आपलें वर्तमान. पूर्वी आपण गदक लक्ष्मेश्वर येथील देसाई व्यंकपाया यांचे चाकर होतों. जे समयीं रेडी श्रीमंत राजश्री स्वामीसी भांडत होती, त्याप्रसंगीं देसाईजीहीं आपणास तीनशें स्वार व तीन हजार बारकंदाज समागमें देऊन मदतीस पाठविलें होतें. आपण तीन वर्षे श्रीमंतजीचे सेवेमधें होतों. प्रतापास सर्व जाणत होतों. गंगाजी संकपाळ यांही वर्तमान निवेदन करतांच कळों आलें की, पत्र हिंदवी आहे. आपणावरी श्रीमंतजी स्वामी कृपा बहुत करीत होते. त्यापरीस विशेष कृपा स्वामींनी करावी ऐसा मनोरथ चित्तीं धरोन एके दोघा अमिरांसी विचारलें तों त्यांची आज्ञा कीं, हिंदवीपत्र नबाब साहेबास गुजरत नाहीं हें वृत्त परिच्छिन्न ध्यानास येतांच हिंदवी पत्र फिरविलें पत्रार्थ ध्यानास आणोन राजश्री गोपाळराम मुनसी यांचे हस्तें फारसी अर्जी तयार करोन, थैली दाखल करोन, दरबारचे मोहोर हशममुल्लाखा पातशाही व बक्षी व अनवरखांजी व फतरुद्दीअल्लीखांजी अर्जबेगी व नजरबेगखांजी बक्षी फौजेचे व ज्यान मिर्जाखा मुनसी व दरगाह कुलीखां दरोगे हरकारे मुसाहेब सरकारचे बहुत व हकीम हसनअल्ली सर्व साधून, माह्यतेवरी आणोन, नजरबेगखां बक्षीचे मा। अर्जी गुजराणिली हें वर्तमान सर्व गंगाजी संकपाळ यासी विदित आहे पत्रीं सर्व लिहिले असेल त्यावरून निवेदन होणार आणि दरबार येथील श्रम व द्रव्यसाध्यें हातात येतो गंगाजी रिक्तहस्तें येथें आले. यास द्रव्य कोठें मिळणार ? स्वामीचे चरणासी जोड परिच्छिन्न करावी हा हेतू पूर्ण स्मरोन, अनेक उपाय योजून, इनायतनामा दरबारामधून काहाडोन कंठुराय कमलापंत साऊकार याचे दुकानीं आणिला. स्वामींचे नांव थोर ह्मणून हरएक मुत्सद्दी वगैरे हजारो मागतात. सेवकानीं तडजोड करून दरबार खर्च ठरवून आपला जातरुका साहू मजकुरास देऊन, त्या हातीं मुत्सद्दी यांची निशा करविली. तपसील जैल नजरबेगखा बक्षी ५०० रुपये, व मुनसी ५००, व अर्जबेगी ५००, व मुनसीचे पेशकार दोघे व खिजमतगार, चोपदार वगैरे किरकोळ खर्च ५०० एकूण दोन हजार रुपये मोठ्या युक्तीने ठरावून कार्य संपादिले गंगाजीस पैसा मिळत नाहीं ह्मणून अजुरदार कासद करोन सेवेसी पाठविला आहे. येथे रुपये १० नक्त कासदास दिधले. स्वामीनीं तेथें बावीस रुपये सध्यां देऊन रसीद बावीस रुपयांची घेऊन पत्राबरोबर पाठवावी, कीं कासदाचे मिरधियापासून रुपये मुजरा घेतले जातील पत्राचें उत्तर पत्र सेवेसी प्रविष्ट होतांच ऐवजाची हुंडी व कोण्हीं आपले सरकारचे मनुष्य समागमें देऊन रवाना करावें. कामदानें १६ रोजाचा वायदा करून आला आहे. यास अविलंबें मार्गस्थ करावें. कासद येथें पावलियावरी राजश्री गोपाळराम व राजश्री शिवराम शामराज उभयता इनायतनामा घेऊन सेवेसी येतात. भेटीअंती सर्व वृत्त मनसुबा पेस्तर करावयाचा विचार सत्वरच केला पाहिजे. यांस यासमयीं फौजेचें बहुत अगत्य आहे. इनायतनामा देतेवेळेस नबाबसाहेबीं आज्ञा केली कीं, पन्नास हजार स्वार व पंचवीस हजार बारकंदाज सामान चांगलें घेऊन येणें. सरंजामही तुह्मांस जो पाहिजे तो दिधला जाईल. मतलब हाच की, जैसे वैकुंठवासी श्रीमंतजीचें नांव थोर आहे तैसाच सामान योजिल्या उत्तम आहे उभयतांच्या भेटी जाहलियावरी कामें बहुत होतील या कामांत गंगाजीनें बहुत मेहनत केली. पत्रीं लिहितां विस्तार होतो. मा। हुसेन स्वामीकडोन गंगाजीचे समागमें आला ते मनुष्य समागमायोग्य नाहीं. कार्याचा नाश यानें बहुत केला. स्वामीचाच प्रताप होता कीं, काम नाश न पावलें उभयतां सेवेसी पावता निवेदन करितील नबाब साहेबांच्या चित्तीं बहुत आलें आहे कीं, एक वेळ स्वामीनीं यावें आणि भेटीअंतीं स्वामीचे उर्जित करोन मग एकचित्तें जें करावयाचें तें करावें. नबाबाहीं बोलूनही दाखविलें कीं, महाराष्ट्र राज्यामध्यें तुह्मीं बहुत दिवस चाकरी करिता, कामेही बहुत केलीं असतील, एक वेळ मोंगलाईचीहि मजा येऊन पाहणें, आणि आपला नक्ष करावा. ऐसें वर्तमान । आहे. सत्वर भेटीचा विचार जाला ह्मणजे यास फौजेचे जरूर ह्मणोन जागिरा चित्तानरूप मिळतील. आणि मदत खर्चही घेतला जाईल श्रुत व्हावें. नजरबेगखानाचे पत्राचे उत्तर बहुत थोरपणें लिहून पाठविलें पाहिजे कीं, कितीएक कामें त्यांचे हातें घेतली पाहिजेत. ते मुरब्बी आहेत कळावे हे विनति.
राजश्री गोपाळराम व शिवराम शामराज यांचे नावें अभयपत्रें पाठविली पाहिजेत. या उभयतांना पाठवावयाकारणे नजरबेगखानजीहीं सांगितले. मनुष्ये थोर कार्याची आहेत स्वामीचे भेटीअतीं सर्व कळों येईल विशेष काय लिहिणे हे विनंति.