[ १७२ ] ।। श्रीभवानीशंकर ।। ६ जून १७४८.
श्रीमंत महाराज राजमान्य राजश्री भगवंतराऊ स्वामीचे सेवेसीः -
सेवक नारो महादेव मु।। अवरंगाबाद साष्टांग नमस्कार विनति उपरि येथील कुशल छ २० माहे जमादिलाखर त्रिसीय प्रहर जाणून निजानंदलेखनार्थ आज्ञा इच्छितों. विशेष. स्वामीनीं अजूरदार कासद आमचा व रायाजी व सिदोजी जासूद सा। चे याबरोबर पत्रें पाठविलीं ते छ १७ माहे जमादिलाखरी भृगुवासरीं शहरी पावलीं पत्रार्थ ध्यानास आणून बहुत संतोष जाहला, तो पत्रीं लिहितां न ये. येथील वर्तमान सांप्रत स्वामीस विदित नाहीं आधींच तो मोगलाई दरबार, दुसरे नवाब निजामनमुलूख यांची बुद्धीस ताम्ररा्ज्यामध्यें कोणास आहे ? मोठें प्रेत्नें मुत्सद्दीयासि व मूसाहेब अमीर पल्लियावरी आणोन कार्य संपादिलें त्याचे खर्च जरूरी लागला त्याचे समारभाकारणें येथें पैसा हातीं लागेना ह्मणून अजुरदार सेवेसी पाठविले त्यासी उत्तर साफ लिहिले की, परभारें तुह्मींच सरकारांतून ऐवज खर्च घ्याल त्यापैकीं साउकारास उगवणी करणें ऐसियासि ऐसें होत नाहीं दरबारचा व्यवहार ऐसा आहे कीं, खर्च ज्या मुत्सद्दीयासि करार करावा त्याचे घरीं आधीं थैली पावती करावी, आणि नित्य घरी दुवख्ता पाणी भरावें, मग जे होणार ते होतच आहे ऐसा रग दरबारचा आहे ऐसेही असता मुरबी मातबर पाहिजे स्वामीचे कार्यनिमित्य मुरबीही मातबर केले, आणि कार्य केले, आणि अजुरदार सेवेसी रवाना केले. यावरी मागें छ ४ जामदिलाखरी नबाब आसफज्याचा काल जाला ताबूत रोजियास पावला कुल सलतनत नबाब नासरजग यांसी सोपिली. ऐसें वर्तमान जालें ऐसियासी नबाब साहेबांचे सरकारांत जे मुत्सद्दी आहेत ते तो पल्लियावरीच आहेत. साप्रत नबाब नासरजंग यांचे सरकारांत मुत्सद्दी मातबर आहेत त्यासी स्नेह बहुत आहे. आणि नबाब नासरजंगजीस अगत्य फौजेचे बहुत आहे राजश्री पेशवेयासीही निर्मल चित्त दिसत नाहीं. पुढे पहावे राजा व सुबा नवा जाला आहे. परतु स्वामीचे नामाभिधान नबाब नासरजंग यास परिच्छिन्न इनायतनामा मोठे नबाबास देती वेळेस विदित आहे यास अर्ज करिता इनायतनामा द्यावयासी विलंब करणार नाहींत, हें आपण जाणतो. जरी स्वामीसरंजाम अति सत्वर पावता होतो तरी दोन्हीही इनायतनामे सेवेसी येऊन पोहोचतात. तैसी तजवीज फौजेची संचणी स्वामी करितील सांप्रत नबाब नासरजग यासी मोतम आहे. मोतम पुरसीची वस्त्रें पाचं उभयतास वेगळीं वेगळीं व नजर पाठविली पाहिजे ते व सरंजाम आलियावरी नजर नबाब साहेबास गुजराणून थैलीयाद व लखोटे स्वामीस पाठविले आहेत अर्जी तजवीज करोन गुजराणिली आहे येथील सर्व वृत्तांत रायाजी व सिदोजी जोडकरी पाहून आले आहेत. निवेदन करिता ध्यानास येईल. स्वामी येथील बदोबस्त जाला ह्मणजे हस्तनापुरीं वकील पाठवून हुजूरचा बंदोबस्त करितों हस्तनापुरी नवी मुद्रा जाली. मा। शाह पातशाह निवर्तले त्याचा पुत्र अहमदशाह तख्ती बसलेत. गजशिक्का शहरीं आला. त्यासी तेथील बंदोबस्त केला जाईल जे मतालब स्वामीचे असतील ते सर्व होऊन येतील मूळ, येथील बदोबस्त जाला ह्मणजे कीर्तही स्वामीचे थोरपणासारखी होईल हस्तनापूरचा बंदोबस्त हातास आला ह्मणजे मुराद सर्व गोष्टी व मनसुबा हासल होईल ऐसे आहे. याहीवरी स्वामी थोर व सरदार आहेत जो मनसुबा हितास येईल तो करतील कठुराय कमळापंत साहुकार याचा वायदा जाला ह्मणून तगादा रुपयाचा आहे तकरार लिहावयास कारण हेंच कीं, साऊकारापासून आह्मास मुक्त करावें, ह्मणून विनति असे. याचें उत्तर अतिसत्वर आह्मांस प्रविष्ट जाले पाहिजे तैसी वर्तणूक केली जाईल. मार्गप्रतिक्षा उत्तराची करितों कळले पा। हरकारे येतील त्याचबरोबर शहत लहान मासीचे २।। व आबासाल दहा शेर पाठविले पा। विशेष काय लिहिणे हे विनति.