[ १६६ ] श्री.
सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामी गोसावी यासीः-
पो। बाळाजी बाजीराव कृतानेक नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन लिहित असिलें पाहिजे विशेष मौजे सांगरुळाविशीं विरुद्धतेचे आचरण धन्याशीं न करावे, सेवाधर्मास हे गोष्ट उत्तम नव्हे, ह्मणोन आपणास पूर्वी पत्र पाठविलें त्याचे उत्तर तपशिलें जे, सागरुळ द्यावयाचा करार आहे, चिकोडीकर व एसाजीराम मध्यस्त आहेत, ह्मणोन लिहिले त्याजवरून मध्यस्ताकडे येविशीचा शोध मनास आणिला त्याणी साफ सागितलं जे, दोन चार गाव धन्यानी घेतले ते कृपा करून देतात, सागरुळ एक राहिले तेही धन्याची सेवा करून आर्जऊन घ्यावें येणेप्रमाणे आह्मी बोलिलों असे ह्मणतात व चिकोडीकराचें पत्रही बजिन्नस याप्रमाणें आलें आहे तुह्मीं पत्रीं लिहिलें जे, आजपर्यंत आर्जिलें त्याचें ऊर्जित काय झालें तैं पुढें होणार ? हे गोष्ट लिहिणे उचित नाही तुमची मातबरी आहे ते धन्याचेच कृपेची आहे याउपरि सागरुळविशी वारवार उपक्रम करून विरुद्धाचरण न करावें धन्याच्या मर्जीपेक्षा सांगरूळ अधिकोत्तर नाहीं . ज्या गोष्टीने धन्याचा संतोष त्याप्रो। असावे स्वत च्या मुलखात अधिकोत्तर बेरजा घालून रोखे करिता बाबतीखेरीज गाव खेडी आहेत तेथेंही रोखे पाठविता. हा बोभाट मुलखातून धन्यासंनिध जातो. तेथून आज्ञापत्रें येथें येतात तरी अशी गोष्ट याउपरि न करावी बाबतीचा करार खावंदानी ज्याप्रों। करून दिल्हा आहे त्याप्रों। वसूल घेऊन निष्ठेनें स्वामिसेवा करावी हेच श्लाघ्य असे सारांश तूर्त मसलतीचा प्रकार आहे तो सिद्धीस पावलियावर विनंति करून विनंतीच्याच मार्गे आपलें कार्य केले जाईल सध्या उतावळीचा प्रकार सहसा न करावा बहुत काय लिहिणें. हे विनति.