[ १६२ ] श्री. २ मार्च १७३९.
तालीख.
अजम कादरखान. तहवार वडिक हत दस्तगाह अजी बाजीराऊ बल्लाळ प्रधान द्रुवा सु।। तिसा सलासीन मया व अलफ. राजश्री भगवतराऊ रामचंद्र व मोरेश्वर रामचद्र व शिवराम रामचंद्र याचें कुळकर्ण व ज्योतिषपण वतन पुरातन मौजे तांदळी ता। राजंणगाव येथील आहे त्यास नारो दत्तो व यादो तुकदेव पानगे कुलकर्णास नडोन कजिया करीत होते. याकरितां मौजे मजकूरचे मुकादम व समाकूल पाढरी व बलुते हुजूर आणून इनसाफ मनास आणिता, पडितमानिल्हेचे वतन कुळकरण व ज्योतिषपण खरें होऊन पानगे खोटे झाले त्यावरून मानिल्हे आपलें वतन अनुभवितील पानगे खोटे झाले ह्मणून यजित खत लेहून दिल्हें. ऐसे असतां पानगे यास तुह्मीं आसरा देऊन गावात ठेविले आहेत तुमचे इमाइतीनें ते राहिले आहेत ह्मणून हुजूर विदित जाहाले तरी पानगे खोटे जाहाले, ऐसे असतां त्यास गांवात राहावयास गरज काय ? व तुह्मी त्यास आश्रा देऊन ठेवावा यास प्रयोजन काय ? याउपरि त्याजपासून पेशजीचे कागदपत्र रुमाल असतील ते घेऊन पडितमानिल्हेचे गुमास्ते गांवांत आहेत त्यांचे स्वाधीन करून पानगे यास गावातून बाहेर काढणे येविषयीं फिरोन बोभाट आला ह्मणजे कार्यास येणार नाही व पानगे गांवांत राहिलियास त्याचा मुलाहिजा होणार नाही. जणिजे छ २ जिल्हेज ज्यादा काय लिहिणें ?