[ १६१ ] श्री. २९ नोव्हेंबर १७३८.
तालीक.
मा। अनाम देशमुख व देशपांड्ये ता। राजणगांव सरकारकून यासीः - बाजीराव बल्लाळ प्रधान सुमा तिसा सलासीन मया अलफ भगवतराव रामचंद्र व मोरेश्वर रामचंद्र व शिवराम रामचंद्र जोशी कुळकरणी मौजे तादळी ता। मजकूर यानीं पुण्याचे मुक्कामीं विनति केली की, मौजे मजकूरचें कुळकर्ण व जोशीपण हीं दोनही वतने शिवजी बिन जैतजी बेस मोकादम मौजे मजकूर याणे आपले वडील निळो सोनदेऊ व आबाजी सोनदेऊ आपले आजे यास खुशरजावदीनें विकत देऊन खरेदी खत करून दिल्हें त्यापासून आपण गुमास्ते ठेऊन दोनीं वतनें अनुभवीत आलो अलीकडे नारो दत्तो व यादो तुकदेऊ पानगे कोरेगांवकर मालुमाती कागद करोन गावांत सुखवस्तू राहत होते ते कजिया करितात तरी स्वामीनीं मनास आणून पारपत्य करावें ह्मणून त्यावरून नारो दत्तो व यादव तुकदेऊ पानगे यास हुजूर आणिले व गावचे मोकादम शिवाजी बिन भिकाजी व भिमजी बिन शिवजी पाटील व गोदजी चौगुला वगैरे बलुते हुजूर आणून करीना पुसिला त्याणी तकरारिया केल्या की , कुभभट ऋग्वेढी आपले गावीचा जोशी कुळकरणी पूर्वी होता त्याचें नकल झाले पानग्याचे वडील राघो दत्तो गावी सुखवस्तु राहात होता. त्याजकडून पाच सात वर्षें मुशारा देऊन कुलकर्ण लेहविलें त्या आधारावर मालुमाती कागद आणून दोनीं वतने आपली ह्मणतात हे कुंभभटाचे नव्हेत शिवाजी बिन जैतजी पा। याणें निळो सोनदेऊ व आबाजी सोनदेऊ यास जोशी पण व कुळकर्णपद दोनीं वतनें रजावदीने दिल्ही हें खरें आहे याप्रमाणें हकीगत आहे. ऐसियासी, पानगे कांही मजकूरचे वतनदार नव्हेत गावीं राहिल्यामुळें खेळ करून नडत होते ऐसें पांढरीच्या व मजालसीच्या विचारें खरे झाले पानग्यापाशीं पुरातन कागदपत्र दस्ताऐवजी नाहींत. यामुळे पानगे खोटे झाले. भगवंतराव रामचंद्र व मोरेश्वर रामचद्र व शिवराम रामचंद्र याचें वतन खरें झाले. त्याजवरून गांवकरी यांस व तुह्मास आज्ञापत्र सादर केलें असे. तरी जोसपण व कुळकर्ण हीं दोनीं वतनें भगवतराव रामचंद्र व मोरेश्वर रामचंद्र व शिवराम रामचंद्र याजकडे चालवून सुदामतपासून हक्क, आदा व इनाम असेल तें कुलकर्णी व ज्योतिषी यांजकडे चालवणे. या पत्राची प्रत लेहोन घेऊन हें पत्र भोगवाटियास परतोन देणें जाणिजे. छ २७ सावान.