[ १५६ ] श्री. तालीक.
राजश्री तुळाजी आंगरे सरखेल गोसावी यासीः -सकलगुणालंकरण अखडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने।। बाळाजी बाजीराव प्रधान आशीर्वाद विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित गेलें पाहिजे. विशेष. राजश्री कृष्णराऊ पंडित अमात्य याजकडील गाव खेडी पुरातन इनाम आहेत व किल्ले गगनगडचे घे-यांचे गांव वगैरे यांची वतनें त्या प्रांतीं आहेत त्यांचा वसूल तुह्मांकडे जात होता. त्यावरून येथून पत्र आपणास पाठविलें कीं , यांच्या तालुक्यास उपद्रव करावा ऐसें नाहीं. ह्मणून लिहिलें त्यावरून याच्या दुमाल वतनें सालमजकुरीं केलीं ऐसें असोन हल्लीं नानाप्रकारें उपद्रव आरंभिला, हबशीपट्टी ह्मणोन रोखे केले आहेत, ह्मणोन लोक आले. तरी पुरातन कान्होजी आंगरे याणीं यांच्या तालुक्यास तिळतुल्य उपसर्ग किल्याच्या तनख्यास देखील केला नाहीं व हबशीट्टीही घेतली नाहीं. ऐसें असतां तुह्मीं हरएक निमित्य ठेवून उपद्रव करावा हे गोष्ट उचित नाहीं. हालीं हें पत्र आपणास लिहिलें असे. तरी रोखे केले असतील ते मना करून पंडितमशारनिल्हेच्या निसबतीस कोणेविशीं उपसर्ग जाहाल्याचा बोभाट वारंवार न ये ते गोष्ट केली पाहिजे रा । छ २० मोहरम. बहुत लिहिणें तरी सुज्ञ असा.