[ १५४ ] श्री. १७३९.
राजमान्य राजश्री भगवंतराव पडित अमात्य यासी आज्ञा केली ऐसी जेः-
राजश्री तुळाजी आगरे सरखेल यांच्या पारपत्याविशी तुह्मास पेशजी आज्ञा केली व वरचेवर राजश्री यशवंतराव महादेव खासनिवीस लिहित गेले त्यावरून तुह्मीं अगेज करून राजश्री गंगाधर पंडित प्रतिनिधि व सामत यास सामील करून घेऊन आंगरियाच्या मुलकात स्वारी केली आहे.लांजेपर्यंत मुलूख मारला ह्मणून खासनिवीस यांनीं विनंति केली व परस्परेही वर्तमान विदित जाहले. त्यावरून स्वामी संतोषी जाहले. तुह्मी कार्यकर्ते सेवक, स्वामीच्या मनोदयानुरूप मनसबा कराल हा स्वामीचा निशाच आहे. तरी योजिला मनसुबा पोक्ता करून जागा दम धरून, गोवळकोट, अंजनवेल, विजेदुर्गपर्यंत मुलूख मारून, दोन चार स्थळें मातबर हस्तगत होऊन, सरखेल देहावर येऊन , सावताचे किल्ले व मुडाडोंगर व सरकारचे गोवळकोट, अंजनवेल, बाणकोट, मंडणगड व शामळाचे तक्षिमेचा ऐवज स्वामीस देत, पेशजी स्वामींनीं त्यास दिल्हें आहे ते घेऊन आज्ञेप्रमाणें वर्तत, ते गोष्ट करणें. ज्या गोष्टीनें स्वामीच्या मनोदयानरुप कार्य घडे ऐसें जालियानें स्वामी तुमचें उर्जित करावयास अंतर करणार नाहींत. केवळ उभे धावेनें चार महाल आलियानें त्याचें पारिपत्य जाहलें ऐसें नाहीं दोन महिनेपर्यंत मुलुखांत राहून, बंदरकिनारादेखील मुलूख मारून, दोन चार जागे हातास येत, ऐसा विचार करणें. गोवळकोटपर्यंत फौज आली ह्मणजे हुजुरूनही साहित्य होईल. राजश्री तुळाजी आंगरे सरखेल यांच्या समाधानार्थ येथून हरकोणाचीं पत्रें गेलीं तरी ते गोष्ट न जाणणें आगरे यांचें पारपत्य करावें हा हेत स्वामीचा पूर्ण आहे स्वामीचे आज्ञेप्रमाणें मनसुबा जाहलियावर सावताचा बहुमान करणें तो स्वामी तुमच्या मनोदयाप्रमाणेंच करितील येविशीं त्यांचेही मनोधारण करून प्रारंभिला कार्यभाग स्वामीचे आज्ञेप्रमाणे सिद्धीतें पाववून स्वामी संतोषी होत, आंगरियाचे पारपत्य होऊन हालखुद वर्तत, ते गोष्ट करणें, ह्मणजे सेवेचा मजुरा होऊन तुमचें उर्जित करावयास स्वामी सहसा अंतर करणार नाहीत सुज्ञ असा.