[ १४१ ] श्री.
राजमान्य राजश्री गंगाधर पडित प्रतिनिधि यासी आज्ञा केली ऐसी जेः -
तुह्मीं व सावंत व राजश्री भगवंतराव पडित अमात्य ऐसे एकत्र होऊन आंगरे याच्या पारपत्याचा विचार अविलंबिला आहे, ह्मणून हुजूर विदित राजश्री यशवंतराव महादेव खासनिवीस यांणीं केलें. त्याजवरून स्वामी बहुत संतोष पावले. त्याचें पारपत्य करणें स्वामीस जरूर. तेच गोष्टी तुह्मी अवलंबिलीत, फार उत्तम केलेंत. याउपरि भारीपणें, मनसबा करून क्षेपनिक्षेप त्याचें पारपत्य होऊन हालखुद वर्तत तें करणें गदस्ताप्रमाणें एकांत एक न मिळता पुर्ता उपमर्द होऊन आला नाहीं तैसें न करणें. त्रिवर्ग एका विचारें वर्तोन फौजेचा गाहा बरे वजेनें राखोन जे गोष्टीनें त्याचें पारपत्य होऊन तुमचे सेवेचा मजुरा होय तें करणे. तेणेकरून स्वामीस संतोष असे. सुज्ञ असा.