[ १४० ] श्रीविठ्ठल.
° श्री ˜
सामंतकुलेशोभानु-
र्मागलाख्यमहेश्वर:।
श्रीनागसामंतमुद्रेयं
जनभूत्यै विराजते।।
राजश्री पंतअमात्य गोसावी यांसीः -- सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने।।
नाग सावंत भोसले सरदेसाई पा । कुडाळ व माहालनिहाय रामराम विनंति येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असावें. विशेष. बहुत दिवस जाहले ; परंतु स्मरणपूर्वकपत्र पाठवून परामृश केला नाहीं येणेंकरून स्नेहास युक्त नव्हे. समयोचित कर्तव्यानुरूप आठवण झाली नसेल. याजउपरि सर्वकाळ स्वानंद वृत्त लिहून संतोषाभिवृद्धि केली पाहिजे. यानंतर आह्माकडील वृत्त पत्रीं लिहितां पुरवत नाहीं. सविस्तर वृत्त राजेश्री धोंडोपंत मुखता सांगतां विदित होईल. बहुत काय लिहिणें.
विशेष. बहुता दिवशीं स्मरण करून तुह्मीं रा. धोंडो त्रिमळ याजबराबर पत्र पा। तें उत्तम समयीं प्रविष्ट झालें. बहुत संतोष झाला पत्र पाठवीत नाहीं ह्मणून बोल ठेऊन लेख केला. तर आह्मींच एक दोन पत्रें तुह्मास पा। परंतु मनावर धरून स्नेहाची जोडी केली नाहीं. स्वार्थावर दृष्टि ते समयीं धरिली होती. हल्ली आह्मां लोकांचें अगत्य धरिलें तर यापेक्षा उत्तम तें काय आहे ? तुह्मांखेरीज आह्मांस दुसरी जोडी काय आहे ? हे घर श्रीदेवब्राह्मणांचें आहे. तुमचे वडील परंपरागत कैलासवासी राजश्री खेमसावंत भोसले सरदेसाई याणीं देवाब्राह्मणांचे ठायी निष्ठा धरून देवाब्राह्मणांची स्थापना करीत आले आहेत. तुह्मी देवाब्राह्मणांची भक्ति करितां ऐसें ऐकिलें, त्याजवरून बहुत समाधान वाटलें आह्मां लोकांचा आगत्यवाद मन:पूर्वक कायावाचामनसा निश्चयरूप असेल तर हे पत्र पावलें ते क्षणी दर्शनाचा योग घडे तो अर्थ केला पाहिजे इमान खरें, वचन सत्य असावें हे जागे आह्मीं आपले पदरीचें आहों दुसरा अर्थ नाहीं. सविस्तर वेदमूर्ति व रा धोंडो त्रिमळ सांगतां कळेल पर्जन्यकाळ समीप आला. त्वरा करावी. दर्शनांतीं सविस्तर अर्थ उभयपक्षीं कळेल चिरंजीव राजश्री आपाजीराऊ तेथे तुह्माजवळी हरघडी आहेत त्यास व जागा जतन होय तें करावे.