[ १३८ ] श्री.
तीर्थस्वरूप राजश्री काका वडिलाप्रति प्रीतीपूर्वक सकल सौभाग्यादिसपन्न मनाबाई सरदेसाईण प्रात कुडाळ व माहालनिहाय दंडवत विनति येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन केलें पाहिजे विशेष. बहुता दिवशीं आशीर्वाद पत्र पाठविले प्रविष्ट होऊन बहुत समाधान झाले याचप्रकारें सर्वदा पत्र पाठवून स्नेहाची अभिवृद्धि जाली पाहिजे यानंतर पत्रीं कितेक स्नेहभाव आणून वडीलपणें बुद्धिवाद लिहिला तो यथार्थच आहे. आह्मींही आपणाठाईं किमपि दुसरा अर्थ धरीत नाहीं. आपले स्नेहाची जोडी केली ते दिवेदिवस वृद्धीतें पावोन विशेषाकारें व्हावी हेंच आह्मांस आवश्यक. यांत दुसरा पदार्थ नाहीं. मातु श्री आह्मांठायी स्नेह धरीत होती तैसा तुह्मीं धरावा ह्मणून विशदार्थे लिहिलें. तरी वडिलांठाई आह्मीं आपणास मानितों. हरयेकविशीं आपणच प्रीति संपादोन स्नेह वर्धमान करावा हें उचित. वरकड भेटीचा मजकूर लिहिला यापेक्षा अधिकोत्तर आणिक काय आहे ? असते पदार्थ तुमचे स्नेहाची जोडी केली आहे येविशीं मुख्यांसही परम आवश्यक आहे. तो विस्तार लिहितां पुरवत नाहीं हाली तुह्मीं भाद्रपदमासीं भेटीचा निश्चय लिहिला तो येथूनही करार करून आपणास पत्रें पाठविलीं आहेत. भेटीच्या प्रसंगास एक महिना आवध राहिली आहे याउपरि अविलंबेंच भेटी होऊन उभयपक्षीं जो कर्तव्यार्थ करणें तो आपले चित्तानुरुप होईल. आह्मीं अपत्यासमान, निरतर पत्रीं परामर्ष करून स्नेह वर्धमान करवीत असावें बहुत काय लिहिणें. हे विनति.