[ १३७ ] श्री.
° श्री ˜
सामंतकुलेशोभानु-
र्मागलाख्यमहेश्वर: ।
नागसामंतमुद्रेयं जन-
भूत्यै विराजते ।।
राजश्री पंत अमात्य गोसावी यासीः - सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने।।
नागसावंत भोसले सरदेसाई प्रांत कुडाळ व महालनिहाय रामराम येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन केलें पाहिजे विशेष. आपण पत्र पाठविलें पावोन बहुत संतोष जाहला व रा. धोंडोपंत व रा. नरसिंगराऊ जाधव हे उभयतां आले त्याणींही कित्येक ममतायुक्त आपलीं वचनें सागितलीं. त्यावरून चित्ताचे ठायीं हर्षोत्कर्ष जाहला ते पत्रीं लिहितां पुरवत नाहीं. आपला आमचा स्नेह अकृत्रिम चालत आला, त्याची वृद्धि होऊन दिवसेंदिवस स्नेह अधिक चाले तो अर्थ केला पाहिजे. यानंतर मनसबेचा अर्थ चित्तांत आणून आपल्या पत्रावरून आवाडेहून कूच करून हेरेस आलों तों आपलीं पत्रें आलीं. त्यामध्यें दिरंग दिसोन आला. त्याउपर मनसबा योजावा तर प्रजन्य समीप येऊन दिवस थोडके राहिले. तेव्हां सहजच प्रस्तुत कालें मनसबेचा अर्थ राहिला. त्यांतून उभयपक्षीच्या भेटीही राहिल्या बरें ! जेव्हा उभयपक्षी चित्ताचे ठायीं दुसरा अर्थ कदाप नाहीं तेव्हां समयोचित भेटीही होतील. मुख्य गोष्ट चातुर्मास प्रजन्य काल. तो जातच आहे त्याउपर दुसरें कारणें उभयपक्षीं भेटी होऊन जो मनसबा करणें तो पोक्ताच करावा यदर्थीचा कितेक मजकूर रा पंत मा। यास स्वमुखें सांगितला असे. ते अनुक्रमे आपणास निवेदन करितील त्यावरून कळो येईल राजश्री सभाजी आंगरे सरखेल याजकडे आह्माकडील भला माणूस व पत्रें पाठवावीं ह्मणोन आपण सागोन पाठविलें. त्यावरून हाली पत्रें पाठविलीं आहेत. पुढां आपले विचारें रवाना करून दिलीं पाहिजे. मुख्य गोष्ट, आपण आह्मास कोणही प्रसंग अनकूल करून द्यावा ऐसें चित्तीं जाहलें तेव्हां सर्व भरीभार आमचा आपणाचवर आहे त्यास पत्रें लिहिली आहेत त्याचें समर्पक उत्तर आलेनंतर येथून भला माणूसही पाठवून देऊं घडीघडी पत्र पाठवीत असावे वरकड कितेक मजकूर पंतमशारनिलेजवळ सागितला असे. बहुत काय लिहिणें हे विनंति
विलसति
लेखनसीमा.