त्यावरून मुकुंदराज ज्ञानेश्वराच्या समकालीन किंवा किंचित् अगोदर झाला असावा असें वाटतें. विवेकसिंधूच्या सध्यांच्या ज्या छापील प्रती आहेत त्या जोगाईच्या आंब्यास असणा-या दुर्बोध मूळप्रतींवरून साक्षात् केलेल्या नसून, विवेकसिंधूची वाचतां येण्यासारखी व अर्थात् अर्वाचीन लोकांस समजण्यासारखी दुसरी एक प्रत आंब्यास आहे तीवरून केलेल्या आहेत, असें सांगतात. विवेकसिंधूखेरीज ज्ञानेश्वरांपूर्वी मराठींत दुसरी ग्रंथरचना झाली होती हें सिद्ध करण्यास एक साधन आहे. ज्ञानेश्वरानें निवृत्तिनाथ, गयणीनाथ, गोरखनाथ, मछंद्रनाथ अशी आपली गुरूपरंपरा दिली आहे. पैकीं गोरखनाथाची गोरखमत ह्या मथळ्याखालीं कांहीं वाक्ये कित्येक पंचागांत देत असतात. गोरखनाथाची एक शकुनवंतीहि प्रसिद्ध आहे. प्रत्येक गुरुशिष्यांत २५ वर्षांचे अंतर धरल्यास गोरखनाथ इ. स. ११०० च्या सुमारास असावा असें होतें. ह्या ११०० च्या शंभर दीडशें वर्षे अगोदरचे मराठी ग्रंथ म्हटले म्हणजे मानभावांचे गुप्त लिपींत लिहिलेले कांहीं जुने ग्रंथ होत. मानभावी जुने ग्रंथ जसेचे तसे छापून बाहेर पडल्याशिवाय ज्ञानेश्वरांच्या पूर्वीच्या मराठीसंबंधानें विशेष कांही लिहिता येणार नाहीं. मानभावांच्या अगोदर मराठींत कांही ग्रंथ होते कीं नव्हते वगैरे विधान करण्यास प्रस्तुत लेखकाला काहींच आधार माहीत नाहीं.
शिवाजीच्या वेळेपासून ज्ञानेश्वराच्या वेळेपर्यंतचे जे हे लेख दिले त्यांपासून (१) १२९० पर्यंत सर्व महाराष्ट्रांत, व १३९५ पर्यंत, कदाचित् पुढेंहि कांहीं काळापावेतों, महाराष्ट्राच्या ज्या भागांत स्वराज्य होतें तेथें, शुद्ध निर्भेळ मराठी भाषा बोलण्यांत व लिहिण्यांत येत असे; (२) १२९० पासून १६५६ पर्यंत, म्हणजे शिवाजीचा अंमल सुरू होईपर्यंत, फारशी शब्दांचें मराठीत प्राधान्य होतें; (३) १६५६ पासून १७२८ पर्यंत फारशी शब्द जलदीनें कमी होत गेले; आणि त्यापुढें (४) १७२८ पासून १८१८ पर्यंत मुसलमान संस्थानांशी झालेला पत्रव्यवहार व सरकारी दफ्तर ह्यांखेरीज इतरत्र फारशी शब्द फारसे उपयोगांत नव्हते; असे चार सिद्धान्त निष्पन्न झाले. पैकीं फारशीचा अप्रतिहृत प्रवेश मराठी भाषेंत १२९० पासून १६५६ पर्यंतच्या काळांत जोरानें झाला. इ. स. १२९० पासून १३१८ पर्यंत महाराष्ट्रांत यादवांचेंच राज्य असल्यामुळें, फारशीचा प्रवेश मराठीत कांहींच झाला नसावा. १३१८ पासून मुसुलमानांकडे राज्याचीं सूत्रें गेल्यावर मात्र फारशी शब्द मराठींत येण्यास सुरुवात झाली. व ह्या आगमनाची अखेर इ. स. १६५६ त झाली. म्हणजे सुमारें ३३८ वर्षे फारशीचें मराठीला निकट सान्निध्य होतें. ह्या सान्निध्याच्या कचाटीत मराठी भाषेची हालहवाल कशी काय होती त्याचा वृत्तांत पुंढे देतों.
इ. स. १३१८ पासून १३४७ पर्यंत महाराष्ट्राचा कारभार दिल्लीहून होत असे. १३४७ त दिल्लीशीं संबंध तोडून हसंग गांगो ब्राह्मणानें दक्षिणेंत ब्राह्मणीराज्य स्थापन केलें तें इ. स. १४९२ पर्यंत बेदरास, १४८४ पर्यंत व-हाडांत, १४८९ पर्यंत अहमदनगरास, १४८९ पर्यंत विजापुरास, व १५१२ पर्यंत गोवळकोंड्यास चालूं होतें, ह्या सालानंतर दक्षिणेंत बरीदशाही, इमादशाही, निजामशाही, आदिलशाही व कुत्बशाही अशा निरनिराळ्या शाह्या १६५६, १५७२, १६३७, १६८६ व १६८७ पर्यंत अनुक्रमें चालल्या. ह्या सालानंतर किंवा ह्या सालांच्या सुमारास मराठ्यांनी सर्व महाराष्ट्र आक्रमिण्याचा प्रयत्न केला. इ. स. १४५० च्या सुमारास खानदेच्या वा-यांत निकम, ठाण्यास बिंबदेव राणे यांचे वंशज, कोळवणांत कोळी, रामनगरास राणे, सोनगड व रायरी प्रांतांत तेथील राजे, शिरकाणांत शिरके, खेळण्यास शंकरदेव, वाडीस सावंत, बेळगांवास कर्णराज, मोरगिरसि मो-ये, असे अनेक लहान लहान मराठे संस्थानिक स्वतंत्रपणें राज्य करीत होते. ह्या लहान लहान संस्थानांत १४५० पर्यंत अस्सल मराठीचाच प्रचार असे. हे प्रांत सोडून बाकीच्या महाराष्ट्रांत फारशी शब्दाचा प्रचार अतोनात झाला. १४५० नंतर हीं लहान राज्यें समूळ नष्ट झालीं किंवा ब्राह्मणी पातशाहांच्या अंकित झालीं, तेव्हांपासून शिवाजी स्वराज्यस्थापन करी तोंपर्यंत महाराष्ट्रांत सर्वत्र फारशी शब्दांचा प्रचार होता. येणेंप्रमाणें काळ व स्थळ ह्यासंबंधानें फारशी शब्दांची व्याप्ति मराठींत व महाराष्ट्रांत कशी होत गेली, त्याची हकीकत आहे.