[ १३६ ] श्री. ६ सप्टेबर १७३२.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५९ परिधावी नाम संवत्सरे भाद्रपद बहुल चतुर्दशी सौम्यवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शंभुछत्रपति स्वामी याणीं राजमान्य राजश्री गोपाळ रामराव मुतालीक दिंगत अमात्य यांसी आज्ञा केली ऐसी जे - तुह्मीं हुजूर विनंतिपत्र पाठविलें, व राजश्री बाळाजी माणको याजवळ कितेक अर्थ सांगोन पाठविला. विनंतिपत्रावरून व यांचे मुखोत्तरें सविस्तर विदित जाहलें. सारांश, लिहिलें कीं, फोडसावंतांनीं सदानंदगडास अपाय करावया विचारावरी येऊन हावभर जाहला होता. हें वर्तमान स्वामीस हुजूर विदित जाहलें, तेच समयीं स्वामींनी राजश्री भगवंतराव अमात्य हुकुमतपन्हा यांस आज्ञा केली. तेसमयी तुह्मीं जमावानिसी जाऊन सांवतास ठाई ठेऊन जागा हस्तगत करून बळकटीनें आहा. पुढें त्या जागियावरून साहेबकाम करून आपले सेवेचा मजुरा करून घ्यावा, ह्मणून निष्ठापूर्वक लिहिलें, व बाळास माणको यांणीही तपशिलेकरून सांगितले. त्यावरून स्वामी तुह्मांवरी बहुत संतोषी जाहले. तरी तुह्मीं अंगेजाचे, मर्दाने, स्वामिकार्यकर्ते, सेवक तैसेच आहा । तुमचे वडिलींही स्वामिसेवा सामान्य केली आहे ऐसें नाहीं. तुमचें सर्वा गोष्टीनें उर्जित करून चालवणें यापरतें स्वामीस दुसरें आधिकोत्तर तें काय ? तुह्मीं आपले सर्वा गोष्टींनीं चित्तास समाधान असो देणें. किल्ला नवा वसविला आहे तेथील बेगमी जाहलियानें जागा जतनं होतो, ह्मणून लिहिलें तें कळलें. ऐशास, तेथील बेगमी करणें हें स्वामीस परम आवश्यक जाणून किल्ल्याचे बेगमीस र्ता। साळसीची खेडीं सुमारें ९ नऊ व र्ता। खारापाटण व र्ता। संवदळ या दो माहालांत रुपये २००० दोन हजार दिले आहेत. ते राजश्री सेखोजी आंगरे सरखेल व संभाजी आंगरे सरसुभेदार आरमार यांस आज्ञापत्रें सादर केली आहेत. तरी तुह्मीं सदरहू दोन हजार रुपये वसूल करून घेणें. जागा जतन करून राहणें वरकड मजकूर मा। सांगतां कळेल. बहुत लिहिणें सुज्ञ असा.
मर्यादेयं विराजते
सुरु सुद बार.