कुंट्यांच्या प्रतींतील चवदावी ओवी तर अत्यंत अशुद्ध आहे. असो. प्रस्तुतचा मुख्य मुद्दा ज्ञानेश्वरींतील जुनी मराठी भाषा कशी असते हें दाखविण्याचा आहे. ज्ञानेश्वरानें ज्ञानेश्वरी आपल्या वेळच्या मराठींत जशी लिहिली तशी सध्यांच्या कोणत्याहि छापील पुस्तकांत ती उपलब्ध नाहीं हें स्पष्ट करण्याच्या हेतूनें - कोणती तरी छापील ज्ञानेश्वरी तुलनेला घ्यावयाचीच होती तेव्हां- कुंट्यांच्या प्रतीचा उल्लेख केला. दुस-या कोणत्याहि छापील प्रतीचा उल्लेख केला असता तरी चाललें असतें. खरी गोष्ट अशी आहे कीं, आज सहाशें वर्षे मराठी भाषेचीं जीं निरनिराळीं रूपें होत आहेत त्यांचा ठसा ज्ञानेश्वरीच्या त्या त्या वेळीं झालेल्या प्रतींत गोचर होत आहे. ज्ञानेश्वरींतील भाषा तेराव्या शतकांतील मराठी भाषा होय. एकनाथानें शके १५१२ त म्हणजे बराबर तीनशें वर्षांनी ज्ञानेश्वरीची पोथी शुद्ध केली; शुद्ध केली म्हणजे आपल्या वेळच्या लोकांना समजेल अशी केली. मूळ ज्ञानेश्वरींतील जीं रूपे एकनाथाच्या वेळीं केवळ आर्ष भासूं लागलीं होतीं तीं एकनाथानें बहुशः गाळली; व त्याच्या नंतरच्या प्रती करणा-यांनीं तर तींत वाटतील ते बदल व अपपाठ घुसडून दिले. ही दशा एकट्या ज्ञानेश्वरीचीच झाली आहे असें नाहीं. चौदाव्या शतकांतला ज्यास आपण सध्यां समजतों त्या नामदेवाच्या अभंगाचीहि हीच व्यवस्था लागलेली आहे. चौदाव्या शतकांतलें मराठी कोणत्या प्रकारचें होतें तें भूपालवल्लभांतील वर दिलेल्या वाक्यांवरून सहज समजण्यासारखें आहे. नामदेवाच्या मूळ अभंगांतील शब्दांचीं रूपें ह्या वाक्यांतील शब्दांच्या रूपासारखीं असली पाहिजेत. परंतु सध्यांच्या नामदेवाच्या छापील गाथेंतील शब्दांची व प्रयोगांचीं रूपें, फार झालें तर, सोळाव्या शतकांतल्या रूपांसारखी दिसतात. ज्ञानेश्वराचे, सोपानदेवाचे व मुक्ताबाईचे म्हणून जे अभंग सध्यां प्रचलित आहेत तेहि असेच अर्वाचीन दिसतात. नामदेवानें मराठींत भारत लिहिलें म्हणून महिपति भक्तविजयाच्या प्रारंभी म्हणतो. हें नामदेवाचें भारत मजजवळ आहे व त्याची भाषा सोळाव्या शतकांतील आहे. नामदेवाचे अभंग तोंडी म्हणण्याची चाल फार असल्यामुळें त्यांत निरनिराळ्या काळीं म्हणणा-यांच्या रोजच्या बोलण्याच्या पद्धतीप्रमाणें न कळत बदल होण्याचा संभव आहे. परंतु, ह्या भारताच्या भाषेंत फारसा बदल होण्यासारखा नाहीं. कितीहि फेरबदल झाला तरी तो कोणत्याहि ग्रंथांत इतका होत नाहीं कीं चौदाव्या शतकांतील भाषा सोळाव्या शतकांतील भाषेसारखी हुबेहूब दिसावीं. खुद्द ज्ञानेश्वरींतहि फेरफार झालेला आहे. कान्हा, मात्रा, उकाराबद्दल अकार, ऐकाराबद्दल एकार, ऐयाबद्दल इया, ओकाराबद्दल अकार, असे बरेच बदल ज्ञानेश्वरींत झालेले आहेत. परंतु ज्ञानेश्वरी दासबोधासारखी किंवा एकनाथी रामायणासारखीं झालेली नाहीं. ह्यावरून अभंग रचणारे ज्ञानदेव व नामदेव चौदाव्या शतकांतल्यापेक्षां पंधराव्या शतकाच्या शेवटीं व सोळाव्याच्या प्रारंभीं झाले असावे असा तर्क करावा लागतो. ह्या तर्काला तीन साधे पुरावे देतों. (१) ज्ञानेश्वरींत फारशी शब्द एकहि नाहीं; नामदेवांच्या गाथ्यांत बरेच आहेत. (२) ज्ञानेश्वरींत चतुर्थीचा किंवा द्वितीयेचा ला प्रत्यय बिलकूल नाहीं, नामदेवांच्या गाथ्यांत आहे. हा ला प्रत्यय फारशी द्वितीयेचा प्रत्यय जो रा त्यापासून आलेला आहे. (३) ज्ञानेश्वरींत व हें उभयान्वयी अव्यय नाही; नामदेवांच्या गाथ्यांत आहे. निंगारकरांनीं आपल्या ज्ञानेश्वरीवरील लेखांत निशाण वगैरे शब्द फारशी आहेत. असें म्हटले आहे. पण तसा प्रकार नाहीं. हे सर्व शब्द अस्सल जुने मराठी आहेत.
असो. इ. स. १५४१ च्या व १४१६ च्या लेखांत फारशी शब्द सांपडतात. ह्या सालांच्या पाठीमागें वीस पंचवीस वर्षे गेलें म्हणजे सावंतांच्या राज्यांतील इ. स. १३९७ तील लेखांत, पर्शरामोपदेशांतील १३५६ तील लेखांत व १२९० तील ज्ञानेश्वरींत एकहि फारशी शब्द सांपडत नाहीं. येणेंप्रमाणें, शिवाजीच्या वेळच्या दरबारी लेखांतील भाषेचें परीक्षण करतां करतां तींत फारशी शब्द व प्रयोग कसे व केव्हांपासून आले ह्या गोष्टींचा शोध लावण्याच्या मिषानें आपण ज्ञानेश्वरीपर्यंत येऊन ठेपलों. मराठी भाषेच्या शब्दरचनेंत व वाक्यरचनेत फारशी भाषेचें कार्य कोणतें, हा प्रस्तुत विवेचनाचा विषय असल्यामुळें ज्ञानेश्वरीच्या पलीकडे आपल्याला जाण्याची जरूर नाहीं. महाराष्ट्रीपासून ज्ञानेश्वराच्या वेळची मराठी भाषा कशी निघाली, ह्या प्रकरणाचा विचार प्रस्तुत कर्तव्य असता तर इ. स. सातशेंपासून तेराशेंपर्यंतचे मराठी लेख पहाणें जरूर होतें. ज्ञानेश्वरानें ज्या अर्थी मराठींत एवढा मोठा ग्रंथ १२९० त लिहिला त्याअर्थी त्याच्यापूर्वी मराठींत कांहीं तरी ग्रंथरचना झाली असली पाहिजे हें उघड आहे. विवेकसिंधु व विवेकामृत, असे दोन शब्द ज्ञानेश्वरींत सहजासहजी आलेले आहेत.