(९) नाहीं माझेनि पाडें वाडु। मी चि सर्वज्ञ एकु रूढु। ऐसा शिवमुष्टिगंडु। घेउनु ठाके ॥
अ. १३, श्लो. ११, ओ. ७०७.
(१०) रसु न्हव्हावा अतिमात्रु। हा घेता सिकोवे मंत्रु। तरि अवंतुनु शत्रु। करितासि गा ॥
अ. १३, श्लो. ११, ओ. ६२५.
(११) किंबहुना पूंसा। पांजरेयामाझि जैसा। वेदाज्ञेसि तैसा। भिउनु असे॥
अ. १३, श्लो. ९, ओ. १८८.
(१२) ह्मणे पूयगर्ते रिगाला। मूत्र-रंध्रौनि निघाला। कटारे मिया चाटिला। कुचस्वेदु॥
अ. १३, श्लो. ८, ओ. ५३८.
(१३) तिये कडौनु येतु वारा। देखौनु धावे सामोरा। आडपडे ह्मणे घरा । बीजें कीजे।
अ. १३, श्लो. ७, ओ. ३७५.
(१४) ज्ञानदेओ ह्मणे, तुम्हीं। संत वोळगावेति, हें मी। पढविलां स्वामीं। निवृत्तिनाथें.।
अ. १२, श्लो. २०, ओ. २४१.
(१५) तिये गीतेचा कलशु। संपूर्ण हा अष्टादशु। म्हणे निवृत्तिदासु। ज्ञानदेवो ॥
अ. १८, श्लोक ७८, ओ. १७९०.
ह्या ओव्यां कुंट्यांच्या प्रतींतील ओव्यांशीं व वर दिलेल्या भूपाळवल्लभांतील वाक्यांशीं ताडून पाहतां, बीड येथील पाटांगणांत सापडलेल्या प्रतींतील ओव्या, नामे, क्रियापदें व शब्दयोगी अव्ययें यांच्यासंबंधानें, कुंट्यांच्या प्रतींतील ओव्यांपेक्षां भूपाळवल्लभांतील वाक्यांशी जास्त जुळतात व ही गोष्ट ह्या प्रतीच्या पुराणत्वाच्या सिद्धीला उत्तम प्रमाण आहे. इ. स. १२९० त लिहिलेल्या ज्ञानेश्वरींची भाषा १३२६ पासून १३५६ पर्यंत लिहिलेल्या ग्रंथांच्या भाषेप्रमाणें असलीच पाहिजे, इतकेंच नव्हे तर ह्या ग्रंथाच्या भाषेहूनहि ती किंचित जुनाट असली पाहिजे. उदाहरणार्थ, वर दिलेल्या ओव्यांतील तांथू हा शब्द घ्या. तंतू ह्या संस्कृत शब्दाचें हें जुनें मराठी रूप आहे. तांतू म्हणजे अनंताचा दोरा, कोळी नांवाच्या प्राण्याच्या जाळ्याचा दोरा, बारीक दो-यासारखे जंत ह्या अर्थी मराठींत अद्यापहि वापरतात. तसेंच, बक-याचें आतडें पिरगाटुन व वाळवून बनविलेल्या दोराला ह्या तांतूपासून निघालेला तांत शब्द लावतात. तेव्हां ज्ञानेश्वरींत हें जुनें रूप येणेंच रास्त आहे. तसेंच मृत्तिकेचा ह्याबद्दल मातियेचा हें रूप ज्ञानेश्वरींत इष्ट आहे. 'काय' बद्दल काइ हें रूप माझ्या ह्या पाटांगणांतील प्रतींत हमेशा सांपडतें. केउते तांथुपटु सांपडतील ते, ह्या शुद्ध वाक्याच्या ऐवजीं कुंट्यांच्या प्रतींत-केउते तंतू पट सांडील तो-असें अशुद्ध वाक्य आहे. केउतें ह्यांत मूळ शब्द केउता आहे. केउता, केउतें, केउती, हीं ह्या शब्दांचीं तिन्हीं लिंगी एकवचनी रूपें आहेत। केउते, केउतें किंवा केउतीं, केउती हीं तिन्ही लिंगी अनेकवचनीं रूपें आहेत. ह्या वाक्यांत केउतें तंतूचें विशेषण आहे. तंतू पुल्लिंगी असल्यामुळें केउता असें विशेषणाचें रूप पाहिजे होतें. परंतु केउते हे पुल्लिंगी अनेकवचनी रूप जुन्या प्रतींतूत असलेलें कुंट्यांच्या प्रतींत तसेंच ठेविलेले आहे व त्याचा तंतू ह्या पुल्लिंगी एकवचनाशीं संबंध लागेना तेव्हां अनुस्वार देऊन क्रियाविशेषण बनविलें आहे. ते तांथू पटु केउते सांडतील, असा मूळ अन्वय होता. अशीच दुस-या वाक्यांचीहि मीमांसा करतां येईल. परंतु ज्ञानेश्वरींतील भाषेची मीमांसा इतरत्र करण्याचा विचार असल्याकारणानें येथें तत्संबंधीं विस्तार करीत नाहीं. येथें फक्त कुंट्यांच्या प्रतींत वर दिलेल्या ओव्यांतील कित्येक शब्दांचीं रूपें कशी आहेत तें दाखवितों.
(पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा)