ह्या उता-यांतील सर्व वाक्ये शुद्ध बावनकशी जुनीं मराठी आहेत व त्यांना फारशीचा बिलकुल गंध नाहीं. ह्या वाक्यांची भाषा बहुतेक हुबेहुब ज्ञानेश्वरींतील भाषेसारखी आहे. बहुतेक म्हणण्याचें कारण असें कीं इ. स. १२९० त लिहिलेल्या ज्ञानेश्वरींच्या भाषेंत व इ. स. १३५६ त लिहिलेल्या ह्या वाक्यांच्या भाषेंत साठ वर्षांचा अवधि गेल्यामुळें किंचित् फरक पडणें साहजिक आहे. तयापुढील व जयाचिये हे जे दोन शब्द ह्या वाक्यांत आले आहेत त्यांचीं ज्ञानेश्वरींत तेयापुढील व जेयाचिये अशीं रूपें सांपडतात, तेयापुढील व जेयाचिये हीं रूपें एकनाथस्वामीनें शुद्ध केलेल्या प्रतीवरून झालेल्या लेखी किंवा छापील ज्ञानेश्वरींत सांपडावयाचीं नाहींत. हीं रूपें एकनाथस्वामीच्या पूर्वीच्या ज्ञानेश्वरींच्या प्रतींत सांपडतात. बालेघाटावरील बीड शहरीं पाटांगण नावाचें एक देवस्थान आहे, तेथील दफ्तर तपाशीत असतां एकनाथस्वामींच्या पूर्वीची एका ज्ञानेश्वरीची प्रत मला मिळाली. कुंट्यांनीं छापिलेल्या ज्ञानेश्वरींतल्यापेक्षां ह्या ज्ञानेश्वरींत ओव्यांची संख्या बरीच कमी असून, हींतील भाषाहि कुंट्यांच्या प्रतींतल्याहून जुनी आहे. शिवाय, ह्या पाटांगणांतील प्रतींतील अक्षरे तेराव्या किंवा चवदाव्या शतकांतील महाराष्ट्रांतील ताम्रपटावरील अक्षरांसारखीं आहेत. वरील लेखांशीं ताडून पहाण्याकरितां व ज्ञानेश्वरीची मूळ खरी भाषा काय होती ते दाखविण्याकरितां ह्या प्रतींतील निरनिराळ्या प्रयोगांच्या ओव्या देतों.
(१) मातियेचा वीटु। घेउनि काइ करी घटु। केउते ताथू पटु। सांडतील ते॥
अध्याय १८, श्लोक ११, ओवी १७
(२) तैसा शरीराचेनि आभासे। नांदतु जबं असे । तव कर्मत्यागाचें पीसें। काइसें तन्हीं।
अध्याय १८, श्लोक ११, ओ. २०
(३) ऐसें व्यापक ज्ञान भलें । जेयांचेया -हदया आलें।
तेयांची समदृष्टि बोले। विशेषू काई॥ अ. ५ श्लोक. १६, ओ. ८७.
(४) मग मशकु हा गजु। कां श्वपचू हा द्विजू। पैल इतरु का आत्मजु । हें उरैल कें॥
अ ५, श्लो. १८, ओ. ९२.
(५) जरि विषइं विषयो सांडिजैल ॥ तरि महादोषिं के वसिजैल।
आणि हा संसारशब्दु नन्हैल। लटका जगीं ॥
अ. ५, श्लोक २३, ओ. २३.
(६) है अष्टधा भिन्न कैसी। ऐसा ध्वनि धरिसी मानसीं।
तरि तेंचि आता परिसैं। विवंचना।।
अ. ७, श्लो. ४, ओ. १७.
(७) किं तो पार्थु मनीं। आझुइं धणि न मनीं। अधिकाधधिक उतान्ही। वाढवितु असे ॥
अ. १३, श्लो. ३४, ओ. ११३१.
(८) हे बहु असो, पंडितु। धरूनु बालकाचा हातु॥
अ १३, श्लो. ७, ओ. ३०७.