[ १३३ ] श्री. १७३२.
राजश्री उदाजीराव चव्हाण हिंमतबहादूर गोसावी यासीः -
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नेहांकित केशव त्र्यंबक रामराम विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करीत गेलें पाहिजे. विशेष. गोसावी यांनी पत्र पाठविलें तें पावलें. तेथें लिहिलें कीं, उत्तरेकडील तहपैकीं राजश्री पंतअमात्य यांकडील खासगत खेडीं व गगनगडच्या तनखियाच्या खेड्यावरी काय पट्टी घातली तें लिहून पाठवणें. पैकियाचा निशा आह्मांकडे झाला. पट्टी लेहून पाठवणें. पैका पाठवून देऊन, राशिवडे, सांगरूळ खेरीज करून वरातदार पाठविले असतील ते आणवणें. ह्मणोन लिहिलें. त्यावरून वरातदार पाठविले होते ते उठवून आणविले. मनारोखे पाठविले आहेत. आपल्या लिहिल्यापेक्षां अधिक काय आहे ? गांवगन्नांची पट्टी पाठवणें तरी राजश्री दामाजीपंत गोसावी याकडे चौथाईच्या तहाकरितां पाठविले आहेत. ते तह करून आल्यानंतर त्याप्रों। पट्टी करून गांवगन्ना आपणाकडे लेहून पाठवून राशिवड्याचे व सांगरूळचे रोखे गोसावी याकडे दिल्हेच आहेत. बहुत काय लिहिणें. कृपा असो दिल्ही पाहिजे हे विनंति.