आतां मराठीचें बिनफारशी असें निर्भेळ शुद्धरूप पाहिजे असल्यास, जेथें मुसुलमानांचा अंमल भासला नव्हता, तेथील लेख पाहिले पाहिजेत. मुसुलमानांचा अंमल नव्हता असे इ. स. १४१६ च्या सुमारास नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत व पश्चिमसमुद्रापासून पूर्वसमुद्रापर्यंत महाराष्ट्रांत दहा पांच प्रांत होत, इ. स. १४०० च्या सुमारास उत्तर व दक्षिण कोकणांत राणे, दारणे, शिर्के, सावंत, वगैरे कांहीं मराठे स्वतंत्र राहिले होते. त्यांच्यापैकीं सावंत ह्यांच्या राज्यांतील एका गांवीं असलेला एक लेख देतों. वेंगुर्ल्यापासून चार मैलांवर मठ म्हणून एक गांव आहे. तेथें वाडीच्या सावंतांच्या पूर्वजांची देवळें आहेत. त्या देवळांतील देवाच्या प्रभावळीवर शके १३१९ त लिहिलेले तीन मराठी लेख आहेत. पैकीं एक लेख येणेप्रमाणें: -
स्वस्ति श्री सालीवान सकु कु १३१९ वरीसे चीत्रभानु संवत्सर आदीक बाहुळ ३ गुरुवारी चांदगडाडुजीपती न-यसी देवाचा दळवै यानें याचा पीता भाम सावंतु तदोद्दीसी उपभागासी देण वीडा धुणा तेला द्वेया उपभोंगासी दत्त रौप्य टाके १४ आखेरतोपी टांके चौदा उपभोगासी देउळाच्या कामाया वेचू द्राम १५०० दळवैपणोचे जाले दीनु आर्थे एखंधर याची ला दीनु नीची वेचू द्राम १००० आखेरतोपी सासु उफरासी भाम सावता वेळाचा दळवै यदोद्दीसी भूमी भ-याया २ मडायी मेव ओंयू व्ययी मेरं नेयी मेरखंडे खडीचे यी मेर आंभ-ययी.
ह्या लेखांत शके १३१९ ला चित्रभानु संवत्सर दिला आहे. तो वर्तमान असून बार्हस्पत्य संवत्सरापद्धतीचा आहे. ह्या संवत्सराला अधिक मास पंचागांत नाहीं. परंतु पुढील सुभानु संवत्सराला ज्येष्ठ अधिक आहे. तो अधिक कदाचित् त्यावेळच्या कोंकणांतील ज्योतिषांनीं चित्रभानु संवत्सराला आणिला असल्यास न कळे, मूळ लेखांतील शक कदाचित् १३१७ असाही वाचतां येईल. परंतु १३१७ ला विक्रम संवत्सर असून चित्रभानु नाहीं. लेखांतील सवत्सर कांहीं असो, साल १३१७ किंवा १३१९ ह्यांपैकीं कोणतें तरी एक आहे ह्यांत संशय नाहीं. प्रस्तुत प्रसंगीं कालनिर्णयापेक्षां भाषास्वरूपाकडे विशेष लक्ष असल्यामुळें इ. स. १३९५ किंवा १३९७ च्या सुमारास मराठी भाषेचें स्वरूप का होतें तें पहावयाचें आहे. ह्या लेखांतील अक्षरें जाधवांच्या तेराव्या शतकांतील अक्षरांसारखी आहेत. ह्या लेखांत सकु, सावंतु, दीनु, हे शब्द जुनें मराठी धर्तीचे आहेत. दळवै (सेनापति), आखर (अक्षर), टाक, द्राम, वरीसें, हेहि शब्द जुने मराठी आहेत. ह्या लेखांत फारशी शब्द किंवा प्रयोग एकहि नाहीं. ह्यावरून शके १३१९ त म्हणजे इ. स. १३९७ त दक्षिण कोंकणात सावंतांच्या राज्यांत शुद्ध मराठी भाषा चालत होती असें दिसतें. आतां ह्या इ. स. १३९७ च्याहि मागें जाऊन इ. स. १३५६ तील एक मराठी लेख देतों. पूर्वी पर्शरामपंडितकृत पर्शरामोपदेश नांवाच्या ग्रंथाचा उल्लेख केला होता. ह्या ग्रंथाच्या शेवटीं खालील मराठी वाक्ये आहेतः –
गत तिथि दुष्णा ॥ वारु चतुर्गुणा॥
नक्षत्र मेळविजे ॥ ध्रुवक ४ मेळविजे॥
तिंहिं भागु॥ उरलेये शेषे लोह पाहिजे।।
एकें जल॥ दाहो स्थल॥
शून्य आकाश ।। स्थलीं सावली ॥
जलीं आडाउ॥ आकाशीं साबलीये।।
आडाउ तीर दार।। हे जयेति॥
आड वार।। आदित्या पासौनु ॥
नक्षत्रें ९ उत्तमें। दाहावें मध्यम ।।
तयापुढील २ उत्तमें ॥ वरिला तिहिं खेळु पांडु १७ उत्तमें।