ह्या लेखात प्लव संवत्सराला प्लवंग म्हटलें आहे. ही केवळ लेखकाची चूक आहे लहान शब्दापेंक्षा मोठा शब्द योजणें जास्त प्रौढ दिसतें, अशा भ्रमानें ही चूक झालीं आहे. ह्या लेखांत १ मौजे, २ व, ३ वा, ४ कसबे, ५ बितपसिल, ६ गल्ला, ७ कैली हे सात शब्द फारशी आहेत. वा हा शब्द व च्या बद्दल योजिला आहे. पाटेलु, बितपसीलु, सकु वगैरे शब्द ज्ञानेश्वरींतील उकारांत शब्दासारखे आहेत. ह्या पत्रांतील भाषेपेक्षां एकनाथाच्या भाषेंत उकारांत शब्द कमी व रामदास वगैरे पेष्तर ग्रंथकारांच्या ग्रंथांत तर त्याहून कमी येतात. ह्या पत्रापेक्षां इ. स. १५५८ तील खालील पत्रांत फारशी शब्द जास्त आहेत.
श्री.
स्वस्ति श्री (स) के १४७९ पिंगळ संवत्सरे माधु सुधु त्रयोदसि वारु मंगळु तदीनीं व्रीतपित्र इनाम लिहिलें. लीखीते चांगो पाटीलु बीन गोंद्य पटैलु मोकदम, व काळशेठी बीन रामसेटी गुठाळु चौगुळा, व एळबो पाटेलु सुपगुडा बीन परसा पाटेलु, खेळ, पाटेलु बीन राघो पाटेलु जें लेकरूं बाबसेठी बीन एकसेठी विगोवी, आपो पटेलु बीन याको पाटेलु सुपगुडा, हीरो पाटेलु बीन भोया पाटेलु हागवणा, कुलुम सेठी बीन हरी सेठी काळोखा, कोयाजी बीन आलोजी मोरीया, जान पटेलु जाधव, व काळी पाटेलु सुपडा, व माद सेठी सेठिया व वणगो माळी मेहतरी व चांगो मेहतरी साळी व समस्त मुजेरीप्रजा व बीजे मोहतर्फा व बलुते व आडाण मौजे निंव प॥ वाई आत्मसुखें सदानंद गोसावी याचे सेवेस व्रीतपित्र इनाम लिहूनु दिल्हें ऐसें जे निमे चावराचा फाळा व पायपोसी व कारकुनु सारा व दमामा व उटआदा व तकदम सारा व बाजे नकददाती बी॥.
ऐनू | आवटु | व | साणेपाळु |
व बीजे फरी व वेसळी व गांवखंडी व पाणीपासोडी वा तकसीमा ११ बाद ता।। ३ बी॥ दळें, आघाडी, फर्साटे. बाकी तकसीम ८ तालुके, रयानी ८ बी॥ त॥ सुतळी, पान, मद, लोह, गवतकडबी, सीरडीबकरा व आर्गतनिर्गत, वेठविजे, सीवबि-हाड दिल्हें आहे. हें पारंपार चालवूनु लेकुरांचा लेकुरीं आवलादी व आफलादी चालऊन हें सत्य. यास जो चुके तो सदानंद गोसाव्याचा द्रोही. चंद्रसूर्यो तपे तववरी रवरवीं पचे. हा नींमु करुनु समर्पिलें. हें कार्या वाचामा जए सत्य.
ह्या इ. स. १५५० च्या सुमाराच्या दोन लेखांत फारशी शब्द बरेच आहेत. परंतु दियानतरावाच्या पत्रांतल्याप्रमाणें मराठी प्रयोग फारशी प्रयोगांच्या धर्तीवर केले नाहींत. चुके, तपे, पचे, समर्पिलें, करुनु, वगैरे क्रियापदांचे प्रयोग शुद्ध जुने मराठी आहेत. वणगो, चांगो, आपो, हीरो, माघु, सकु, वारु, मंगळु, पाटेलु, वगैरे नामेंहि जुन्या मराठींतल्याप्रमाणें ओकारान्त व उकारान्त आहेत. इतकेंच नव्हें तर बीतपसीलु, ऐनु, ककुनु वगैरे फारशी शब्द देखील उकारान्तच योजिले आहेत. हा लेख लिहिणा-यांना फारशी येत नसल्यामुळें, व्यवहारांत रूढ झालेल्या फारशी शब्दांखेरीज जास्त फारशी शब्द किंवा प्रयोग त्यानीं योजिले नाहींत हें उघड आहे. मराठीचें जुनें रूप ह्या दोन लेखांत बरेंच पहावयास सांपडतें.
इ स १५५० च्या अगोदरचे म्हणजे इ. स. १४९५, १४७१, १४१६ वगैरे सालांतीलहि दरबारी फारशी-मराठी लेखांत फारशी शब्द बरेच आढळतात. जेथें जेथें म्हणून मुसुलमानांचें राज्य कायम झालें होतें, तेथें तेथें दरबारांतील सर्व मराठी लिहिण्यांत फारशी शब्दांचा भरणा विशेष असे. दरबारापासून दूर अशा गावीं व सरकारी अधिका-यांचा जेथें संबंध नाहीं अशा गांवकीच्या किंवा धर्माच्या किंवा गोतकीच्या खटल्यांत जे कागदपत्र होत, त्यांत फारशी शब्दांचीं संख्या कमी असे. परंतु त्यांतहि फारशी शब्द बिलकुल नसत अशी मात्र गोष्ट नव्हती. इ. स. १४१६ च्या सुमारास मुसुलमानांचें राज्य महाराष्ट्रांत होऊन बराबर ९८ वर्षे झालीं होतीं व मुसुलमानी भाषेचा देशांत इतका प्रचंड संचार झाला होता कीं दरबारापासून अलिप्त राहणा-या मनुष्याच्याहि बोलण्यांत व लिहिण्यांत फारशी शब्द नकळत येत.