[ ११९ ] श्री. १७३०.
राजमान्य राजेश्री सेखोजी आंगरे सरखेल यासी आज्ञा केली ऐसी जेः-
जंजिरे रत्नागिरी येथें तुह्माकडील उपसर्ग लागतो, येणेकरून उस्तवारी होत नाही, ह्मणून हुजूर विदित झालें. ऐशास, राजश्री भगवंतराऊ पंडित स्वामी संनिध आले आपले निष्ठेचा अर्थ निवेदन केला त्याचे सर्व प्रकार अभिमान धरून चालवणें व जंजिरेयाची उस्तवारी करणें स्वामीस आवश्यक. असे असतां तुह्मीं उपद्रव करावा हे गोष्ट उत्तम नव्हे. तुह्मीं तेथील साहित्य करावे, उपसर्ग न द्यावा, हें उचित आहे. हालीं हे आज्ञापत्र सादर केलें आहे . तरी जजिरे मजकुरास कोणेविशीं उपद्रव लागो न देणें. सर्व प्रकारें साहित्य करून जंजिरे मा। ची उस्तवारी होय, स्वामी संतोष पावत, तो अर्थ संपादत वरकड कितेक श्रीनिवास शिवदेऊ तुह्मांस लिहितील त्याप्रमाणें साहित्यास अंतर न करणे. सुज्ञ असा.