[ ११८ ] श्रीबालकृष्ण. १७३०.
राजश्री भगवंतराव पंडित अमात्य हुकमतपन्हा यासीः-
प्रति सौभाग्यादि संपन्न बाईसाहेब उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लेखन करणें. विशेष. शिवाजी मल्हार याजसमागमें विनंतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनाभिप्राय अक्षरशा अवगत जाहला. दर्शनास यावयाचा मजकूर लेख केला. ऐशास येविशीं राजश्री स्वामीस विनंति करून पेस्तर आज्ञापत्र सादर केलें जाईल तुमचें सर्वप्रकारें साहेबास आवश्यक आहे. तुह्मास वस्त्रें पाठविलीं आहेत. त्यांची यादी अलाहिदा आहे, तेणेंप्रमाणें घेऊन उत्तर पाठवावें. तुह्मीं जिनस पाठविला तो प्रविष्ट जाहला , व मागाहून मोहे नारळ सुमार ७ सात पाठविले तेही प्रविष्ट जाहले . जाणिजे छ ९ रमजान. बहुत काय लिहिणें. लेखनसीमा.
रजु सही.