अर्जदास्त.
अर्जदास्त अर्जदार। बंदगी बंदेनवाज
अलेकं सलाम । साहेबांचे सेवेसी
बंदे शरीराकार। जीवाजी शेखदार
बुधाजी कारकून। प्रगणे शरीराबाद
किल्ले कायापुरी। सरकार साहेबांची
आज्ञा घेऊन स्वार जालों ती प्रगणे मजकुरीं येऊन सरकार काम करावयास लागलों. तो प्रगणे मजकूरचे जमेदार दंभाजी शेट्ये व कामाजी महाजन व मनीराम देशमुख व ममताई देशपांडी व क्रोधाजी नाईकवाडी ऐसे हरामजादे फार आहेत. ते सरकारकामाचा कयास चालू देत नाहीत. दंभाजी शेट्या कचेरीस येऊन जोम धरून बसतो. मनीराम देशमुख आपलें काम परभारें करून घेतो. ममताई देशपांडीण इणें तमाम प्रगणा जेरदस्त केला. क्रोधाजी नाईकवाडी याणें तमाम तफरका केला. तो साहेबांपासून जरासंध चोपदार आला. त्यानें खबर केली कीं मागून यमाजीपंताची तलब होणार. त्यास, त्या धास्तीनें तमाम प्रगणा वोस जाला. बितपशील कलम. डोळसवाडीस मात्र कांहीं रुई झुई वस्ती राहिली. कानगांव तो बंद जालें. दोन्ही वेशीचीं कवाडें लागलीं. नाकापुरास वहाव सुटले. तोंडापूर तो तफरका जालें. दंताळवाडी ओस पडली. दिवेलागणी देखील राहिली नाहीं. केसगांवची पांढर जाली. शिरापूरचा लोक दरोबस्त थरथरा कापतो. हातगांव कसाल्यानें जर्जर जाले. त्यांच्यानें आतां कांहीं लावणी होत नाहीं. पायगांवची मेटें बसलीं, ढोपरपूचीं राहिली. चरणगांव चाली सरली. गांडापूर वाहूं लागलें. लिंगस्थान भ्रष्ट जालें. उठूं पळूं लागलें. धीर धरवेना. ऐसी प्रगण्यांत कोर्दी बुडाली. यावर सरकारकाम सुरू करीत होतों. तो यमाजीपंताची परवानगी आली कीं, हुजूर येणें, आपणास साहेबाचा आश्रय आहे. एका जनार्दन बंदा। बंदगी रोशन होय! हे अर्जदास्त.
ही अर्जदास्त एकनाथी भजनींभारुडांतील आहें. हींत किती फारशी शब्द आहेत, त्याची गणती करण्याचें सोपें काम वाचकांकडेच सोंपवितों. एकनाथस्वामी इ. स. १५४८ जन्मले. त्यानंतर सुमारें ४० वर्षांनीं त्यानीं भजनीभारुड लिहिलें असे धरल्यास ही अर्जदास्त इ. स. १५८८ च्या सुमाराची असावी असें दिसतें. आतां इ. स. १५४१ तील एक व १५५८ तील एक असे दोन जुने मराठी लेख देतों. हे लेख साता-याजवळील निंब येथील ग्रामस्थांनीं एका गोसाव्याला दिलेलीं दानपत्रें आहेत. तीं सातारा येथील रा. रा. तुकारामपंत ठाकूर वकील यांच्याद्वारा मिळालीं.
श्री.
श्री स्वस्ति श्री सकु १४६३ वीरखे प्लवंग संवत्सरे चैत्र सूध सप्तमी रविदिने तदीनि श्री सदानंद गोसावियाचे मठ मौजे निंब परगणे वाई तेथ अन्नदान प्रतीदिनि चालवावेया वृत्तीपत्र कंठगिरी गोसावी वा सदानंद गोसावी यांसी लिहुनि भीवोजी ++ जी देसाई, व माया पाटेलु, व सेटीया बसव सेटी कसबे मजूकुर, व प्रसोजी आषाडा मौजे आखाडें, व माल पाटेलू मूरुकुट मौजे राहगी हे मूख करूनि समस्त देसक परगणे कुडाल लीहुनी दीलें ऐसें जे प्रति वरुशि देणें बीतपसीलु गळा कैली खंडी ४।३।
(तक्ताः पाहाण्यासाठी येथे क्लिक करा.)