[ ११६ ] श्री. १७३०.
सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री भगवंतराव पंडित स्वामी गोसावी यांसीः-
पोष्य बाजीराव बल्लाळ कृतानेक नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत असलें पाहिजे. विशेय आपण पत्र पाठविलें तें पावोन संतोष जाहला. राज्यांतील विचार प्रसंग व थोरपण संरक्षण व्हावयाचा व कितेक वरकड विचार विस्तारें लेख केला. व रा। संभाजी पडवळ आले याणीं मुख वचनें निवेदन केलें. त्याजवरून साकल्य अर्थ कळला. ऐशास, आमचा विचार आपणासी आणि सारखा आहे असें नाहीं. कायावाड्मनसा आपले अभीष्ट असेल तेंच करावें हें अत्यावश्यक आहे. परंतु राज्यांतील विचार प्रसंग प्रस्तुत कोणे प्रकारचा जाहला आहे, तो आपणास न कळेसा काय ? सारांश, आह्मीं उत्तरप्रांतें गेलों होतों ते आलों. राजश्री स्वामीचे दर्शनास जाऊन तेथें आपला प्रसंग सविस्तर राजश्री स्वामीस विनंति करून आपले साहित्यास सर्वथा आह्मांपासून अंतर होणार नाहीं. आह्मीं आपणाखेरीज नाहीं. एतद्विषयींचा कितेक अर्थ रा. संभाजी पडवळ यांस सांगितला आहे. हे आपणास निवेदन करतील. याजवरून कळों येईल. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे विनंति. आह्मीं सातारियास आलियावरी मा।रनिलेस आह्माजवळ पाठवून दीजे. ही विनंति.