[ ११४ ] श्री. ३ जुलै, १७३०.
विनति उपरि येथील कुशल आषाढ बहुल चतुर्दशीपावेतो यथास्थित असे विशेष. आपण लिगो रघुनाथ यासमागमें पत्र पाठविले ते पावले. त्याउपरि त्याची रवानगी करावी तों स्वामीकडे अगोदर आह्माकडील राजश्री आनंदराव पाठविले होते ते व आपणाकडील रा. रामाजी शिवेदेऊ पत्रे घेऊन आले. अनुक्रमें दोनही पत्रांवरून व मानिल्हेच्या मुखातरावरून आद्यत कळोन समाधान झालें. ऐशास, आपण राज्यांतील धुरंधर, धन्यानी दिवसेंदिवस कृपा करावी, हेच उचित आहे. प्रसंगोपात्त जें होणार त्यास ईश्वरइच्छा, तथापि आपणानिराळे कोणी नाहीत प्रस्तुत सविस्तर अर्थ माहाराज राजश्री स्वामीचे सेवेसी विदित करून उभयतांस दर्शन करविलें . याजकडूनही जो अर्ज करवणें तो करवून अवघा अर्थ श्रवण झाला. त्यास, सारांश, गोष्ट, स्वमीकडून सभ्य मनुष्य येऊन बोलीचाली व्हावी, याकरिता धन्यास विनंती केली. त्यावरून राजश्री नारो केशव यास आणावयाविशी हुजुरून आज्ञा झाली आहे व उभयतांसही, धन्यानीं स्वमुखें आज्ञा केली असे. तरी कोणेविशीं संदेह न धरितां नारोपंतास येथवरी पाठवून द्यावें. बोलीचालीमुळें बनाव होऊन आल्यास मग कांहीं चिंताच नाहीं. ही गोष्ट नव्हे तेपक्षी नारोपंतास निश्चयात्मक पावून देऊन मागील प्रसंगाकरितां कोणी पाय घेत नाहीं ह्मणून लिहिलें तरी तो विचार आणिक होता. आतां आह्मीं आहों आमची रीत आपणास न कळे ऐसें नाहीं. तरी सत्वर मानिल्हेस पाठविलें पाहिजे. येविशीं सविस्तर मानिल्हे सांगतां कळो येईल. मुख्य धनी याची दया संपादन घ्यावी, यांत सर्वही स्वामीचें स्वहित आहे. येविशी मानिल्हे सांगतां कळो येईल. बहुत काय लिहिणें. कृपावर्धमान केली पाहिजे. हे विनंति.