[ ११२ ] श्री. १७३०.
राजमान्य राजश्री भगवंतराव पंडित यांसी आज्ञा केली ऐसी जे - तुह्मीं विनंतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट झालें. लेखनार्थ अक्षरशा अवगत झाला. तुह्मांकडून गोविंद व्यंकटाद्रि आले, यांणीं विनंति केली त्याजवरून सविस्तर कळों आलें. ऐसियास, चिरंजीव राजश्री संभाजी राजे यासी भेटीस आणावयाबद्दल चिरंजीव राजश्री फत्तेसिंग भोंसले व राजश्री श्रीनिवास पंडित प्रतिनिधि व राजश्री नारो रामचंद्र मंत्री व राजश्री बाळाजी बाजीराऊ रवाना केले आहेत हे चिरजीव राजश्री यास घेऊन येतील तुह्मांसही हुजूर दर्शनास यावयाची आज्ञा करून राजश्री भवानीशंकर मोरेश्वर यास पाठविले आहे हे स्वामींची आज्ञावचनें सांगतील तरी तुह्मीं कोणेविशीचा संदेह चित्तांत न आणितां पत्रदर्शनी स्वार होऊन हुजूर दर्शनास येणें तुमचे मनोदयानुरुप विवेक करून दिल्हा जाईल कदाचित् बनाव न बसे तरी तुह्मांस तुमचे स्थळास याल तैसे पोहोंचाऊन दिल्हे जाईल नि सदेहरूप पत्र पावेल ते क्षणीं स्वार होऊन येणें विलंबावरी न घालणें कितेक आज्ञा करणें ते गोविंद व्यकटाद्रि यांस केली आहे. सागतील त्यावरून कळों येईल जाणिजे. सुज्ञ असा.