[ ११० ] श्री. ६ एप्रिल १७२९.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५५ सौम्यनाम संवत्सरे चैत्र बहुल चतुर्थी रविवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शंभुछत्रपति स्वामी याणीं समस्तराजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री भगवंतराऊ अमात्य हुकुमतपन्हा यासी आज्ञा केली ऐसी जेः-
तुह्मीं हालीं विनंतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लिहिलें वृत्त विदित जालें. ऐशास रत्नागिरीबाबत हत्ती आपण स्वामीस नजर करून रत्नागिरीचा प्रसंग आपले स्वाधीन जाल्यावरी आधीं हे गोष्ट कर्तव्य, आपण कांहीं आपाजीराव नव्हों, ह्मणून तुह्मीं कितेक नारोराम हरकारा व मल्हारजी सूर्यवंशी यांसमागमें सांगोन पाठविलेंत, त्यावरून यदर्थी अपूर्व कार्य आहे कीं, तुह्मीं सेवक असेच आहा । वडीलवडिलापासून स्वामिकार्यप्रसंगें धण्यास संतोषी करून आपली नामना संपादित आलेस, तेथें वरकड गोष्टींचे अगाध आहे ऐसें नाहीं त्यास, तुह्मीं रत्नागिरीचा प्रसंग उत्तर लिहून हातीं घेऊन बावड्यास आलेस, हत्ती स्वामीस देणार, ऐसें वर्तमान परस्पर व तुह्मांकडील येथें आले गेले त्यांनीही सांगितलें. तेव्हां तुह्मीही बोलिले होतेस तदनुरुपच हे चर्चा आहे, ऐसें स्वामींनी मनांत आणून ज्योत्याजी दळवी यासमागमें हत्ती पाठवून द्यावयाविशीं लिहिलें त्यावरी तुह्मीं जोत्याजी दळवी व सूर्याजी खाडे व मल्हारजी सूर्यवंशी यांसमागमें सांगोन पाठविलें कीं, हत्ती नजर करीतच आहो, त्यास गोपाळराव यांचे समाजविसीस स्वामींनी एक हत्ती द्यावा व आपला अभिमान धण्यास असावा, ये गोष्टीचे अभय शपथपूर्वक आपणास असावे ह्मणून सू।न पाठविलेंत त्यावरून स्वामींनीं तुह्मास बेलरोटी पत्र पाठविले गोपाळरायास एक हत्ती द्यावयाची गोष्ट ती सामान्य केली आणि तुह्मांकडील आले होते त्याजवळ राजश्री नानाजी वैद्य व केशव त्र्यंबक याचे विद्यमानें निश्चयपूर्वक होऊन जोत्याजी दळवी व तुकोजी व मल्हारजी यास तुह्माकडे पाठवून दिलें प्रस्तुत तुह्मीं हुजूरचे पत्रीं लिहिलें कीं, नानाजी वैद्य व केशव त्र्यंबक यांस लिहिलें आहे ते विदित करितील त्यावरून त्यास तुह्मीं काय लिहिलें ह्मणून मनास आणितां, जें तुह्मीं लिहिलें तें अव्यवस्थच लिहिलें । तरी हे चर्चा कांहीं स्वामींनी केली नसतां, तुह्मीं ऐसें काल्पनिक ल्याहावें हें उचित नव्हे. तुह्मीं होऊन बोलिलेस आणि स्वामीस सांगोन देखील पाठविलें कीं, आपण आपाजीराऊ नव्हों. त्यास, गोपाळरायाचे समजाविसीची ही गोष्ट स्वामींनी मान्य केली होती. किंबहुना, गोपाळराव स्वामीची आज्ञा घेऊन जाऊं लागले तेव्हां त्याणींही विनंति केली ते समई त्यासही स्वामींनीं सांगितलें कीं, भगवंतराव यांचें दर्शन जाहल्यावरी तुमचेंही समाधान स्वामी करितील, परंतु तुह्मीं शेवट ऐशी गोष्ट केली. त्यास, क्षुद्र मनुष्याचे बोलें वर्तता । आजवरी क्षुद्राचे विचारें जें जालें तें तुमचें तुह्मांस ठाउकें आहे. पुढेंही प्रत्ययास येईल. वरकड स्वामींनी क्रियापूर्वक तुमचें चालवूं ह्मटल्यास स्वामीकडून अंतर होणेंच नाहीं. परंतु तुमचें तुह्मांसच अनुभवास येईल. वरकड हत्तीचा विषय बहुतसा नाहीं. स्वामींनीं हत्ती बहुत मिळविले, बहुत पाळिले, आणखीही पाहिजेत ते मिळतील. परंतु तुह्मींही होऊन सांगोन देखील पाठविलेंत त्याचा परिणाम लवकर कळला हें बरेच जालें. आपाजीराव आपण नव्हों ह्मटलेंत. त्यास, आपाजीरायानीं करायाचें तें केलें स्वामीस कांहीं हत्तीचें अगत्य आहेसें नाहीं. हत्ती तुह्मांस असो देणें आणि आपलें समाधान असो देणें. स्वामीस हत्ती मिळतील. कांहीं चिंता नाहीं. तुमचें समाधान राहिलें. ह्मणजे सर्व झालें. येविशीं जोत्याजी दळवी यास आज्ञा केली, सांगतां कळेल. सुज्ञ असा.