[ १०९ ] श्री. ३ एप्रिल १७२९.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५५ सौम्य नाम संवत्सरे चैत्र बहुल प्रतिपदा गुरुवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शंभुछत्रपति स्वामी याणीं समस्तराजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री भगवंतराऊ अमात्य हुकुमतपन्हा यांसी आज्ञा केली ऐसी जेः-
तुह्मीं विनंतिपत्र तुकोजी खाडे व मल्हारजी सूर्यवंशी यां समागमे पाठविलं ते प्रविष्ट जाहलें. आपण स्वामीचे हुकुमबारदार सेवक, स्वामीचे आज्ञेपेक्षां विशेष आपणांस कांहीं नाहीं, धनसंपदा सर्व स्वामीची आहे, आपण साहेबांचीं लाविली झाडें आहों, आपला अभिमान स्वामीस आहे, उतगेमातगे चाकर नहों, ह्मणून कितेक तपसिलें निष्ठापूर्वक लिहिलें ते सविस्तर विदित जालें व तुह्मांकडील हरदू जणांनींही केले. ऐशास तुह्मीं जे लिहिलें तें यथार्थ आहे तुह्मांस स्वामीचे आज्ञेपेक्षां कांहीं विशेष आहे किंवा तुह्मांजवळ जे धनसंपदा आहे ते स्वामीची, एतदर्थी कांहीं अन्यथा आहे ऐसें नाहीं जो स्वामीचा मनोदय तेच तुह्मांस परमावश्यक आहे. तेथें उतगेमातगेपणाची संभूति ही तुह्मांकडे येणें नाहीं. स्वामीचीं लाविलीं झाडें ह्मणविता तद्भतच स्वामींस पूर्ण तुमचा अभिमान आहे त्याप्रमाणें तुमचें साभिमानपणें चालवायास स्वामी अंतराय कदापि होऊ देणार नाहीत. येविशी हल्ली जोत्याजी दळवी वा। मुल तुह्मांकडील एकजण यासमागमें बेलरोटी पाठविली आहे. येविशीं विशदेकरून ल्याहावें तरी मनोमन साक्ष आहे. तत्रापि दर्शनानंतरही कळेल. हालीं पाठविले आहेत हे आज्ञेप्रमाणें जबानी सांगतां कळेल व गांवांविशीं लिहिलें तरी राजश्री नारो हणमत तुह्मांकडे गेले आहेत. त्यास त्या गांवचा प्रसंग ठाऊका आहे. तथापि ते हुजूर आल्यावरी त्याजवळ आज्ञा केली जाईल. वरकड कोणेविशीं संदेह धरावासें नाहीं. जें जें स्वामी बोलिले आहेत त्यास सर्वात्मना तफावत होणार नाहीं येविशी राजश्री नानाजी वैद्य व राजश्री केशव त्र्यंबक लिहितां कळेल. जाणिजे. सुज्ञ असा.