[ १०८ ] श्री. २७ फेब्रुवारी १७२९.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५५ कीलक नाम सवत्सरे फाल्गुन शुद्ध दशमी गुरुवासरे क्षत्रियकुलावंतस श्रीराजा शंभुछत्रपति स्वामी याणीं समस्तराजकार्यधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री भगवंत राऊ अमात्य हुकमतपन्हा यांसी आज्ञा केली ऐसी जेः-
तुह्मीं विनतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहलें राजश्री मोरेश्वरराव यांणीं मागती खटला आरंभिला वस्तभाव ओळखिली आहे, ते देत नाहीं स्वामीनी न्याय्यत त्यास आज्ञा करावी अंगानिराळे टाकिलें, ऐसें सत्य असलिया आपण पाहून घेऊ, ह्मणून कितेक तपसील लिहिले तें विदित जाहलें ऐशास, तुमचे घरगुती प्रसंग घरचेघरीं त्याणीं तुह्मीं समजावें. स्वामीकडे या गोष्टीचा काहीं गुंता आहे, ऐसें नाहीं. ह्मणून पहिलेंच तुह्मांस लिहिलें तथापि तेंच तें तुह्मी लिहितां. स्वामींनी अंगानिराळें टाकिलेसें सत्य असलिया पाहून घेऊं ह्मणून लिहिलें तरी मौरेश्वररायाचें अगत्य धरून तुमचा प्रसंग अगानिराळा टाकिला, ऐसें तो कांहीं जालें नाहीं. न्यायत: सांगावें, त्यास, तुह्मी उभयतांहि सन्निध नाहीं. सन्निध आल्यानंतर न्यायताही सांगणें तसें सांगितले जाईल. गांजिलें पळें, नवांजिलें मरें । साहेबीं पायीं लोटूं नये ह्मणून कितेक लिहिलें. तरी ऐसें लिहावेसे काय जालें आहे सर्व प्रकारें तुमचें चालवावयास स्वामीपासून अंतराय कांहीं होत नाहीं. यलकेचीसाल व बाव्याच्या शेंगा व काठ्या पाठविल्याप्रमाणें प्रविष्ट जाहल्या. वरकड मल्हारजी सांगतां कळेल. बहुत लिहिणें तरी सुज्ञ असा.
मर्यादेयं
विराजते.