[ १०७ ] श्री. १७ फेब्रुवारी १७२९.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५५ कीलकनाम संवत्सरे फाल्गुन शुद्ध प्रतिपदा इंदुवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शंभुछत्रपति स्वामी याणीं समस्तराजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री भगवंतराव अमात्य हुकुमत्पन्हा यांसी आज्ञा केली ऐसी जेः -
तुह्मी विनंतीपत्र पाठविलें तें प्रविष्ट जालें. पूर्वी राजश्री रामचंद्र पंडित यांवरी धण्यांनी दया केली. त्याणीही निष्ठेनें राज्यांत सेवा केली आपणही स्वामीचे सेवेसी अंतर केलें नाहीं. याकरितां स्वामींनीं आपला अभिमान असेल तरी चालवावें. घरफुट झाली आहे. राजश्री आपाजीराव याणीं आपल्या बारगीरवस्ता रत्नागिरीस होत्या त्या आटोपिल्या आहेत. त्या त्यास आज्ञा करून देववाव्या. ह्मणून कितेक आद्यंत विस्तारेकरून लिहिले तें अक्षरश: विदित जालें. ऐशास, तुह्मीं जे लिहिलें तें अवघें यथार्थच लिहिलें. त्यांत कांहीं अन्यथा आहे ऐसें नाहीं. तुमचे वडिलीं सेवा केली त्याप्रमाणें तुह्मींही सेवा करावी स्वामींनी तुह्मांवरी कृपा करून चालवावें. तुमचें जगनामोश तुमचें वडिलाप्रमाणें व्हावें, हेंच स्वामीस अगत्य. त्याप्रमाणें स्वामींनी तुमचे चालवावयास अंतर केलें ऐसें नाहीं. आणि पुढेंही स्वामीस तुमचें चालवावें ये गोष्टीचा अभिमान अगत्य आहे. ऐसें असोन तुह्मीं इतकें पाल्हाळयुक्त ल्याहावेंसें काय आहे घरफुटीचा प्रसंग तर हा विचार तुमचे घरचा आहे यास स्वामीनी काय करावें. वरकड तुमचे हुद्दा मामला बहुमान यास स्वामीकडून अंतर जालें नाहीं. पुढेंही होणार नाही. येविशीं समाधान असो देणें. मल्हारजी सूर्यवंशी याजवळ आज्ञा केली आहे. सांगतां कळेल बहुत लिहितों तरी तुह्मीं सुज्ञ असा.
मर्यादेयं
विराजते.