[ ९९ ] श्री. १७२८.
राजश्री पंतअमात्य हुकुमतपन्हा स्वामीचे सेवेसींः-
श्रीमंत सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री द्वारकोजी यादव कृतानेक साष्टांग दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वाभ्योदये कुशललेखनपरामर्ष करीत असावें. यानंतर आपण वार्तिकासमवेत श्रीमत सकलसौभाग्यादिसंपन्न मातु.श्री बयासाहेबास पाठविलें तें विदित करून अक्षरश: श्रवण केलें. आह्मांस पत्र पाठविलें, तेंही प्रविष्ट होऊन सविस्तर वर्तमान कळों आलें. पेशजी आपलीं पत्रें आलीं व हालीही तुमची पत्रें आलीं कितेक विस्तारें लिहिलें. त्यांत मायेममतेचा अर्थ काय लिहिला न लिहिला हें तुमचें तुम्हांस दखल आहे. आह्मां सामान्य लोकास दरम्यान मध्यस्तीस घालावें आणि ऐसें स्वामीनीं लिहित जावें, यांस महत्त्वास भूषार्ह आहेसा अर्थ नाहीं या राज्यांत थोरले महाराज राजश्री यांणीं आह्मां लोकाचीं घरें वाढविलीं. तीर्थरूप राजश्री निळोपंत आजे, राजश्री रामचंद्रपंत बाप, त्यामागें आह्मीं सेवा केली. काळ साह्य होता, तों धणी यानीं वाढविलें. आजी ता। चालत आलें तीन पिढ्या सेवा केली, त्याचें सार्थक जाले । ज्याणीं दिले त्याणी घेतलें, हा दडक कोठेंही नव्हता । या राज्यात पाहिला । विश्वासू कारकून पाठवावा तरी कोणीं पाय घेईनात. ऐसे कितेक पर्याये लिहिले तरी तुह्मी सरकारकून, परपरागत या राज्यांतील सेवक, सर्वांनीं तुम्हां जवळून सिकोन जावे, असे असोन तुह्मी धण्यासी माया ममता न दर्शवितां इतराच्या दुर्बुद्धी ऐकोन, धण्याचे पायाशी अमर्यादा होऊन, लोकोत्तर इतकेंच पदरीं पडले । धण्यास कितेक शब्दारोप ठेऊन लिहिलें तरी धण्यासी तुह्मी अथवा कोणी शब्द ठेवावा ऐसे नाहीं. कोणे एकाचे चालविलें नाहीं आबालवृद्धापर्यंत धण्यानी लोभ करून, अंतरें महदंतरें पडली तरी क्षमा करून, सर्वापराध पोटांत घालून चालविले लहानाचे थोर केलें. पुढें त्यांची महत्त्वे विशेष वाढवावीं हेच चित्ती सर्वात्मना आहे. तुह्मीं किल्ले पनाळा असतां धण्यास नाना प्रकारचे संकटांमध्यें प्रसंग प्राप्त केलें. किंबहुना, अरिवर्ग असतील त्यांच्यानेही ऐशीं अमानुष कर्मे होणार नाहींत. ऐसे असोन तुह्मीं आपले आचरणास चुकला नाहीं. तत्रापि इतकेंही धण्यानीं पोटांत घालावयासी कारण कीं, तुह्मीं परपरागत सेवक, तुमचे वडिलांनीं या राज्यांत श्रम साहस आपे जिवाभ्य करून, ऐशास पात्र जाले. त्यामागें तुमचें चालवावें, तुमचे हातून महत्कार्ये घ्यावी, असें चित्तांत असता, ई।। पासून निग्रही वल्गनायुक्त आचरणें होता राहिली नाहींत तुमचे तीर्थरूप राजश्री रामचंद्र पंडित यांणीं थोरले महाराजासंन्निध कोणें रीतीनें वर्तणूक केली हे लोकांत कीर्ती प्रख्यात आहे. महाराज राजश्री या प्रांतीहून चजीप्रांतें जाणें जाले तत्समई संपूर्ण राज्य व लोक लोकपाळ स्वामित्व राजश्री पंडितमा।रनिले यांचे गळा घालोन खासा स्वामींनीं चंजी प्रांतें स्वारी केली. त्या मागें सबळ रिपुवर्ग यांचा उद्भव जाहला. तत्समई यवन उन्मत्त होते. त्यास इत्यादि अमर्यादकांस शासने करून, त्यांचा संव्हार करून, दमसर्द केलें. राज्य शथीनें राखिलें. तदोत्तर महाराज राजश्रींचें आगमन चंजीहून या प्रांते जालें. तेव्हां पंडितमशारनिलें यांणीं बहुत विशेषाकारें नम्रता धरून जाते समई, राज्य व लोकपाळ व गड किले स्वाधीन केलें होतें त्याप्रमाणें धण्याचे धण्यासंन्निध वोपून आपण विनीत प्रकारें होऊन, ' पुढें सेवकास आज्ञा कर्तव्य काय ?' ह्मणून पंडित मा।रनिले याणीं विनंती केली. हें किमर्थ कीं आपण ब्राह्मणलोक, परंपरागत सेवक, जीवित हें क्षणभंभुर आहे, ज्या धणियाचे कृपांजळें हें पद प्राप्त जालें, त्यासी निमकहराम न होता कल्याणाभिवृद्धि इच्छिल्यानें आपल्यास श्रेयस्कर, येणें करून धर्म, अर्थ, काम, मोक्ष, चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त होतात. मागें पुढें कोणी दूषण ठेवीना ऐसे अभ्यत करणें विवेक वर्तत आले जे, हे श्रीचे वरदीराज्य, यासी दिल्लीश्वरादि कोणी स्वधर्मकर्तव्यतेस प्रवर्तले त्यांचा गर्व हत होऊन पराभव पावते जाले याकरितां धण्यासी मर्यादेनें असावें ऐसे चित्तांत आणून तुमचे वडील चालत आले. तुह्मांसही पंडितमा।निले याणीं सकलकलाविद्यासंपन्न केलेच होतें. प्रस्तुत त्यामागें आपण प्रतिदिनी पुराणश्रवण देवब्राह्मणाचे ठायीं भक्ति धरिली धर्मशास्त्र इत्यादि सर्वही नीत तुह्मांस करतलामल. तेव्हां सर्व अर्थ तुह्मास नकळेसा काय ? असें असोन, कोणेक गोष्टीचा युक्त विचार नाही. ' सितोळे घोरपडे यांचा कजिया लागोन कलह वाढला , आणि निरपराधें आह्मावरी जुलूम होऊन सर्वस्वें अपहार केला', ह्मणून लिहिले तरी घोरपडियाचे अथवा तुमचे तरी धण्यांनी काय वाईट केले होतें ?