[ ९६ ] श्री. १७२८.
राजश्री भगवंतराऊ अमात्य हुकुमतपन्हा यांसीः -
श्रीमंत मातुश्री राजसबाईसाहेब उपरी सुहुर सन तिसा आश्रिन मया अलफ. तुह्मीं विनंतीपत्र जिवाजी शिवदेऊ यासमागमें पाठविलें तें येऊन प्रविष्ट जालें पत्रार्थ सविस्तर निवेदन जाला धण्यांहीं इमान क्रियापुरस्कर राजश्री उपाध्ये व राजाजी वैद्य व शिवाजीपंत व राजश्री हिंमतबहाद्दर पाठविले त्यावरून आपण हाजीर जालों. धण्यांही आश्वासन जतन करून उर्जित करावें. बहुमानें चालवावें. जिवाभ्य एकरूप निष्ठेने सेवा करून. आपण लेकरें आहों. अन्याय असले, तथापि धणी मायबाप, क्षमा करावी. हेंही रूप धण्याचें आहे दया करून चालवावे ह्मणऊन तपसिलें तुह्मीं विनति पत्रीं लिहिल्यावरून अक्षरश विदित होऊन संतोष जाला, ऐशास, तुह्मीं वंशपरंपरागत साहेबांचे धुरधर सेवक सर्वहिविषयीं क्षमा करून तुमचें चालवावें हेंच चिरजीव राजश्रीस व साहेबांस अवश्यक आहे. अंत:पर याविषयी तुह्मीं आपल्या चित्तांत अणुमात्र संशय न धरिता आपलें समाधान असो देऊन याउपरी दर्शनाची त्वरा करणें. साहेबांचे आज्ञेवरून व राजश्री हिंमतबहादूर याचे वचनें चिरंजीव राजश्री शिवरामपंतास आणविलें, उत्तम गोष्ट केली चिरंजीव राजश्रीचेही पत्रें व आज्ञा सागोन पाठविणें ते त्याणी तुह्मांस सांगोन व लिहोन पाठविलीच आहे. त्या वचनासे सर्वथा अन्यथा होणे नाहीं. साहेबांसही तुह्मांपेक्षां दुसरे अधिकोत्तर नाही. साभिमानयुक्त तुमचें गोमटें करून चालवावें, तुमच्या हातें महतकार्य प्रयोजनें सिद्धीस नेऊन उत्तमपणाचेंच परिणाम करणें, हेंच अगत्य आहे. याविषयीं राजश्री उदाजी चव्हाण हिंमतबहादर यांसी आज्ञा केल्यावरून लिहितां कळेल. बहुत लिहिणें तरी तुह्मीं सुज्ञ असा.
विलसति लेखनावधि.