[ ९४ ] श्री. २४ फेब्रुवारी १७२८.
राजमान्य राजश्री भगवंतराव अमात्य हुकमतपन्हा यांस आज्ञा केली ऐसी जेः-
नारायण हरकारा याजबरोबर तुह्मीं सांगोन पाठविलियाप्रमाणें अक्षरशा विदित करितां श्रुत झासें व शफतपूर्वक निष्ठापूर्वक सेवकपणाचा अर्थ सांगोन पाठविला त्यावरून बहुत संतोष जाहला तरी याच अन्वये दिवसेंदिवस तुह्मीं सेवा करून ममता संपादावी आणि स्वामीनीं अकृत्रिमपणे तुमचे मनोदयानुरूप चालवावें हेंच अवश्यकता आहे दुसरा अर्थ नाहीं. तुमचे वडिलांनीं या राज्यात श्रम साहस करून राज्य रक्षिलें. त्यांचे पुत्र तुह्मी आहा त्याचे प्रमाणेच सर्व भाराभार तुह्मांवर देऊन सेवा घेऊन चालवावें हेंच उत्तम आहे एैशास. स्वामी तीन वर्षे स्वारीस होते. प्रस्तुत आगमन जाहलें. तुह्मीं दर्शनास येऊन सतोषी करावें हें चित्तांत आहे. त्यास, श्रीचा उत्साव रामनवमीचा आला आहे. येथें येऊन सपादावा हें स्वामीचें चित्तांत विशेषेकरून आहे. तुह्मीं चित्तांत कांहीं संदेह न मानितां स्वामीवर भार घालून यावें. उत्सावप्रसंगीं कर्जवाम होईल तर श्रीकृपेनें कर्ज फारीक होईल. तुह्मीं मागील जाले गोष्टीचा खेद चित्तांत न आणावा. स्वामीचा तो चित्तांत कोणे येक गोष्टीचा संशय नाहीं. मध्यस्ताचा विचार तर, या उपरी तुह्मीं आपलें यश अपेश धन्यावर घालोन दृढतर विचार करून यावयाचें करणें सर्व मान अपमान व तुह्मांस बरें वाईट ते गोष्टीस खासा स्वामीच मध्यस्त धनी आहेत. तुह्मीं या उपरी किमपि संदेह न मानितां यावयाचें करणें. रा० गोपाळ रामभाऊ यांसीं दर्शनास नावेक चालवावयाविसी सांगोन पाठविलें. येवरून आज मंदवारी प्रात. काळीं दर्शनास आणून समाधान करून वस्त्र दिल्हें. ज्याचे वडिलांनीं राज्यांत सेवा केली त्याचें चालवावें हेंच आवश्यक. ऐशास तुमचे आगमनानंतर तुमचे विचारें जो प्रसंग करणें तो केला जाईल. तुमचे येण्याचे प्रसंगास येथून कोणास पाठवावयाचें ते लिहून पाठवावें. त्याप्रमाणें रवाना करून पाठवूं, येविसी तपशिलें सुबजी भोसले वा। मूळ व नारायण हरकारा यासि आज्ञा केली असे. आज्ञेप्रमाणें सांगतां कळेल. तदनुरुप उत्तर सत्वर पाठवावें. सकलादेविशीं सांगोन पाठविले. सकलाद न मिळे यास्तव स्वामीचा फर्गोल पांघरता पाठविला असे. घेवणे. जाणिजे. रवाना चंद्र २४ माहे रज्जब. सुज्ञ असा.