[ ९३ ] श्रीगोपाल. १७२८.
राजश्री पंतआमात्य हुकुमतपन्हा गोसावी यांसींः -
सकल गुण अलंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नेll. उदाजी चवाण हिंमतबहादर ममलकतमदार कृतानेक दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशललेखनाज्ञा केली पाहिजे. यानंतर रा० रामभाऊ यांजबरोबर कितेक अर्थ मुखोत्तरें व पत्रीं लिहून पाठविलें. पाहोन सकल अर्थ अवगत झाला. ऐशास आह्मीं पुरातन तुमचे दुसरा अर्थ किमपि नाहीं. दूरस्थ असिलों तरी चित्तवृत्ती आपलेठायीं निर्विकल्पवृत्तीनें असे. तेथें इतर पदार्थ कल्पना नाहीं. आह्मीं आपले मैत्र ह्मणविल्यास मैत्रीस अंतर सहसा न घडे. एतद्विशींचा प्रसंग सविस्तर राजश्री रामभाऊ यांसीं सांगितला आहे. सांगतां विदित होय बाबतीच्या अमलाचा चौका बसवावा, याविसीं सिरोळ अकीवाट दोहीं स्थळीं अधिकारी ठेविले आहेत. त्यास आज्ञा करणें ती केली आहे. यथाशक्त्या चाकरीस अंतर करणार नाहींत. वरकड प्रसंगास आह्मीं कोठेंहि असलों तरी समीपच आहों, ये रीतीनें चित्तांत असो द्यावें. प्रसंगास चुकतों असें नाहीं. विशेष काय लिहावें कृपा असो. हे विनंती.