[ ८८ ] श्री. ३१ आगष्ट १७२४
स्वस्तिश्री राज्याभिषेक शक ५१ क्रोधीनाम संवत्सरे भाद्रपद बहुल अष्टमी भानुवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शंभूछत्रपति स्वामी याणीं राजमान्य राजश्री यशवंतराव गोपाळ व दामाजी हरी यासी आज्ञा केली ऐसी जे :-
राजश्री रामराव दादाजी हे स्वामीच्या राज्यांतील पुरातन एकनिष्ठ सेवक स्वामीच्या पायांशीं त्रिकर्णशुद्धीनें निष्ठा धरून सेवा करीत होते. यांचें चालवणें हें स्वामीस परम आवश्यक, याकरितां स्वामी यावरी कृपाळू होऊन यांस नूतन इनाम कुलबाब कुलकानू हालीपट्टी पेस्तरपट्टीसहित, खेरीज हकदार व इनामदार करून, मौजे सोलंकुर ता। तारळें हा गांव इनाम अजरामरहामत करून दिल्हा असे मौजे मजकूर मा। निले वंशपरपरेनें इनाम अनभवितील. तुह्मीं मौजे मजकुरास तोसीस तगादा लागो न देणें. जाणिजे. बहुत काय लिहिणें.
मर्यादेयं
विराजते.
सुर सुद बार.