श्री. १२ मार्च १७२७.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५३ प्लवंग नाम संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदा रविवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शाहू छत्रपति स्वामी याणीं राजश्री अंबाजी त्र्यंबक यांसी आज्ञा केली ऐसी जेः- मनसुब्याचा अर्थ सविस्तर राजश्री बाजीराव पंडित प्रधान यांस लिहिला आहे त्यावरून कळेल. तरी तुम्हीं पंडित मशारनिल्हेस चार गोष्टी विचाराच्या सांगोन अमित्राचे पिछावरी * * * कृयत फितूर तुटे तो अर्थ करणें. तुम्हीं स्वामीजवळ बोलोन गेला काय, करता काय, हा विचार कळत नाहीं. राजश्री प्रधानाचें व राजश्री सेनापतीचें चित्तीं विचार काय आहे हा त-ही शोध लेहून पाठवणें. त्यावरून स्वामी निश्चिती मानतील. गुज काढावयाचा विचार चित्तांत येत नसेल तरी इलाज काय? वारंवार लिहावयाची सीमा झाली! परंतु कार्यभागाचा विचार दिसत नाहीं. याउपरि तरी गुज काढावें. फितूर तुटावा ऐसें चित्तांत असलें तरी पत्रदर्शनीं फौजेनिशी अमित्राचे पिछावर येऊन त्याची वाताहात करणें. बहुत काय लिहीन.
हें काव्येतिहाससंग्रहान्तर्गत पत्रेंयादी वगैरेंतील १६७ वें पत्र आहे. ह्या पत्रांत १ शाहू, २ मनसुबा, ३ बाजीराव, ४ फितूर, ५ इलाज, ६ मशारनिल्हे, ७ फौज आणि ८ व, एवढे ८ च शब्द काय ते एकंदर १२७ शब्दांतून फारशी आहेत. म्हणजे,
इ. स. | फारशी | मराठी | एकंदर | शेंकडा मराठी शब्द |
१६२८ | २०२ | ३४ | २३६ | १४’४ |
१७२८ | ८ | ११९ | १२७ | ९३’७ |
ह्या दोहोंशीं प्रस्तुत खंडांतील वर उल्लेख केलेल्या शिवाजीच्या ३६ व्या लेखांतील शब्दांची तुलना केली असतां पुढील फळ येतें:-
१६७७ | ५१ | ८४ | १३५ | ६२’२ |
ह्याचा अर्थ असा झाला कीं, दरबारी लिहिण्यांत, मुसुलमानांचें राज्य चालू असतां इ. स. १६२८ त शंभर शब्दांतून सरासरीच्या मानानें १४ शब्द मराठी येत; शिवाजीचें स्वराज्य चालू असतां इ. स. १६७७ त शेकडा ६२ शब्द मराठी येत, आणि शाहू राज्यावर असतां इ. स. १७२८ त शेंकडा ९३ शब्द मराठी येऊं लागले. परपराज्याचा भाषेवरती केवढा परिणाम होतो त्याचा हा रोखठोक ताळा आहे!
इ. स. १६२८ पासून १७२८ पर्यंत मराठींतील दरबारी पत्रांत फारशीचा भरणा कोणत्या प्रमाणानें होत होता त्याचा हा तपशील आहे. १६२८ च्या पूर्वी इ. स. १४१६ पर्यंतचे मजजवळ फारशीमराठी लेख आहेत; त्यांतहि १६२८ ल्या लेखांतल्याप्रमाणेंच फारशी शब्दांचा भरणा अतोनात आहे. मुसुलमानांच्या राज्यांत दरबारी म्हणून जेवढे लिहिणें होतें त्या सगळ्यात फारशी शब्दांचें व प्रयोगाचें प्राधान्य उत्कट असे. ह्या दरबारी लेखांपेक्षा तत्कालीन मराठी कवींच्या लेखांत फारशीचा भरणा अतिच कमी आहे. परंतु त्यांच्या देखील लेखांत फारशी शब्द अधूनमधून घुसल्यावाचून राहिले नाहींत. उदाहरणार्थ, इ.स. १५४८ पासून १६०९ पर्यंत असणा-या एकनाथस्वामींच्या ग्रंथांतील एक उतारा देतों.