[ ७५ ] श्री. २१ मार्च १७१६.
श्रीमत महाराज राजश्री पंत स्वामीचे सेवेसीः-
विनति सेवक गोविंद रंगनाथ कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना स्वामीचे कृपावलोकनेकरून चैत्र शुद्ध नवमी शुक्रवारपर्यंत सेवकांचें वर्तमान मु ।। कल्याणीं यथास्थित असे विशेष महाराजाचे दर्शनास वेदमूर्ती राजश्री कान्हो पाध्ये औरगाबादेहून आले त्याबरोबरी आह्मी आपल्या वतीनें प्रसगाचे वर्तमान स्वामीचे सेवेसी लिहोन पाठविले होते, त्यावरून विदित जाहलें असेल व स्वमुखें उपाध्येबावानी निवेदन केलें त्याप्रमाणे अभ्यंतर्गत अवगत जाहले असेल परतु त्याप्रमाणें पारिपत्य होऊन आलें नाही. आह्मीं अवग्र एक मासपर्यंत मार्ग लक्षिला. त्याउपर आह्मी निजामउन्मुल्ख व तुरुकताजखान यांची आज्ञा घेऊन स्वार होऊन गेलों. तेव्हा तेथल्या कर्जदारानी अडविलें. त्यांची निशा करावयास अवग्र पंधरा दिवस लागले. शेवट रुपयास जमान गणेश विश्वनाथ आमचे जावाई यांस ठेवून स्वामीकडे यावयास तयार जाहलों. तों संगमनेरीहून खान अजम महमद उमरखान सुभेदार प्रांत संगमनेर व नाशिक व कल्याणभिवडी याचें पत्र तुरुकताजखान यांसी व आह्मांस आलें कीं, गोविंद पंडित वकील यांसि पाठविणे, वतनाचा अमल देऊन. त्याजवरून आह्मीं छ १५ मोहरमीं स्वार होऊन संगमनेरास आलों, तों उमरखान बागलाणांत मौजे अभोणें नजीक करेलीमोरेली येथें जाऊन वेढा घालून बैसले होते. तेथें आह्मी जाऊन वेढा घालून बैसले होते. तेथें आह्मी जाऊन त्यांची भेट घेतली. स्वामीचे तर्फेनें त्यास पत्र व अष्टगोळी सल्ला दिधला. बहुत समाधान पावला. त्यांजवर अंमलाचे जफ्तचिठी मागितली ते ह्मणों लागले कीं , आह्मांस सेरणी काय देता ? तेव्हां आह्मी बहुत प्रकारे रदबदली केली. परतु हे मोंगली लोक, त्यांहींमधे पठाणतरीन, आपला हेका न टाकित । दुसरी गोष्ट पूर्वींल कारभारी , जे नुटअल्लीखानापाशीं होते, ते हल्लीं याजपाशीं आहेत त्यांणीं पूर्वील कबुलायतीची हकिगत त्यांस जाहीर केली. त्याप्रमाणे मागों लागला. तेव्हां आह्मीं बोलिलों कीं, दरबारीं औरगाबादेस खर्च आह्मांस बहुत लागला याकरितां आह्मांस पांच हजार रुपये देवत नाहीं. तेव्हां निदान प्रसंग जाणोन आह्मांशी शामजी महादेव व रामाजी गोविंद दिवाण यांसी खानानें रदबदलीस घालून पांच हजार रुपये करार केले आहे. याखेरीज त्याचे नायब कल्याणीचे अजम कालेखान व पातशाही दिवाण शरीफ अल्लीखान व चौधरी व कारभारी व किरकोळी लोक ऐसे मिळोन दोन हजार रुपये पाहिजेत वग हजर करावयास कापड हजारा रुपयांचें पाहिजे. एकूण सहा हजार रुपये खर्च करावे, तेव्हां तो। सोनवळाच्या अदकाराचा अंमल दरोबस्त हातास येतो आणि सुरळीत धंदा चालतो. त्यास ऐवज तो मिळत नाहीं अगर सावकारही मिळत नाहीं या प्रांतीं काळ बहुत विषम पडला आहे याकरिता रुपयांस कोण्ही बघत नाहीं. वतनाचें कार्य तो महत् कष्टेकरून कळसास आणिलें आहे, परंतु सहा हजाराकरिता तटोन पडलें आहे महाराजांस असत्य वाटेल, याकरितां कोणे जातीनें रुपये खर्च होतील त्याची नावनिसीची याद अलाहिदा पाठविली आहे, त्यावरून विदित होईल व महाराजास उमरखान यांनी पत्र लिहिले आहे. त्याजवरून श्रुत होईल त्यास, स्वामी ह्मणतील कीं, तुह्मांस ऐवज देविला होता, तो आणवून कार्यसिद्धि करावी होती तरी, स्वामीने रायाजी प्रभूकडे पाच सहस्त्र रुपये देविले. त्यांत आज ता। हजार रुपये पावलें. त्याचा खर्च कैसा जाहला ह्मणीजेल तरी, रा। काशीपंत बुंदखानी याचे गुजारतीचे कर्ज रुपये ४९२ फारीख केले. तेव्हां ते गेले. त्याजवर निजामन्मुलुख आले. त्यांची भेट घेतली तेव्हा त्याचे दरबारी खर्च जाहला. एकंदर जाहला रुपये २०४। बाकी राहिले. रुपये, त्यापैकीं उमरखानास शेला व किरकोळी नजर व चोपद व खिजमतगार मिळोन खर्च जाहला रुपये ५४ ।। . बाकी निवळ ऐवज राहिला तो लोकांदेखील आमच्या पोटास खर्च जाहाला, रुपये २४९।. ऐसे हजार रुपये खर्च जाहले त्याखेरीज आपणास कर्ज रुपये ८३७ जाहले आहे बाकी रुपये रायाजी प्रभूकडे चार हजार राहिले त्याबद्दल अवरंगाबादेहून त्याजकडे चार वेळां पत्रें व मनुष्यें पाठविलीं परतु त्याजपासून एक रुपया प्राप्त नव्हें. हाली बाळाजी विश्वनाथ याच्या कमाविसदारांनीं रायाजी प्रभूचा प्रांत बळकाविला; आणि प्रभूचे कमाविसदार होते ते पळोन रायाजी प्रभूपाशीं गेले. धामधूम बहुत गगथडीस जाली ते पत्री काय ह्मणोन लेहावी ? हें वृत्त सविस्तर रा. कानो पाध्ये यांस श्रुत आहे, त्यांस स्वामीनें विचाररिलें पाहिजे आता तरी खंडेराव दाभाडा व रायाजी प्रभु व नरसोजी मो-या व राजजी थोरात ऐसे एकत्र होऊन, गंगाजी त्रिंबक याचे फौजेस सामील होऊन, त्यासमवेत फौजेनसी येवलें प्रातें खंडेराव दाभाडे याच्या लेकी दोन व सासू व मेहुणा ऐशीं माणसें सहा अंबोजी देशमुख यांणीं धरिलीं आहेत. तरी सोडवावयास आले आहेत. कोणाचे चाकर हाहि निर्वा कळत नाहीं, ऐसा प्रसंग जाला आहे याउपर आह्मांस रायाजी प्रभु कोठून रुपये देऊं पाहातो ? स्वामीच्या वतनाचें कार्य तो रुपयावीण अटकलें आहे आह्मीं तो रुपयांचे तरतुदेबद्दल उमरखानाचा निरोप घेऊन फाल्गुन वदि दशमीस कल्याणास आलों. मागाहून खानही येणार आहेत. रुपयांकरितां स्वामीचे शेवेसी विनती पत्र लिहिलें असे. तरी, कृपाळू होऊन सध्यां पोतांतून वतनाच्या अमलाबद्दल ऐवज तूर्त रुपये ६००० पाठविले पाहिजेत या उपर अनमान करावयाचा प्रसग नव्हे. नाहीं तर अपकीर्ति होते. विशेष लेहावें तरी स्वामी धनी आहेत. सेवेसी श्रुत होय.