[ ७० ] श्रीराम. ८ ऑक्टोबर १७१३
राजश्री सोनजी घोरपडे हवालदार व कारकून, कोट कोल्हापूर, गोसावी यांसीः -अखडितलक्ष्मीअलकृत राजमान्य स्ने।। रामचंद्र नीळकंठ हुकमतपन्हा आशीर्वाद व नमस्कार सुहुरसन अरबा अशर मया व अलफ शकरगिरी गोसावी जटाधारो परपरा दुर्गानाथ हे बहुत भले, परमेश्वरपरायण याणें विनंति केली जे, मौजे बहिरेश्वर कसबा हवेली परगणे मजकूर येथें जलशयनस्थल रमणीय आहे, तेथे मठ बांधोन राहावें, पुष्पवाटिका लावून जपतप करून असावें, असा हेत आहे, ऐशास, अतीत अभ्यागत येतील त्यांची व्यवस्था लागेल ये गोष्टीच्या सिद्धीस इनाम दिल्यानें राजश्री छत्रपति स्वामीस व स्वामीच्या राज्यास अभिवृद्धि चितून असो, ह्मणून. त्यावरून मनास आणितां गोसावी गुरुभक्त निस्पृहवृत्तीनें असतात. यांची मठस्थापना करून दिल्यानें श्रेयस्कर. अतीत अभ्यागतास अन्न पावेल तेणेंकरून राज्याचे अभिवृद्धीस कारण आहे. यांस मौजे मजकुरी अर्धा चावर जमीन इनाम देणें. सन इसनेमध्यें आह्मीं व राजश्री हिंदूराव पन्हाळ्यास स्वारीस आलो ते प्रसंगी मौजे मजकुरास मुकाम जाहला. तेव्हां श्रीचें दर्शन घेतलें. बहुत जागृत स्थल आहे. पूर्वी राजश्री थोरले कैलासवासी स्वामीचे वेळेस श्रीचे पूजेस नैवेद्य नंदादीप याची बेगमी होऊन ऊर्जा चालत होती, अलीकडे चालत नाही. ऐशास, हे सनद दिली आहे. जाणिजे. चंद्र २९ रमजान. निदेश समक्ष.