[ ६८ ] श्रीरमाकांत २७ फेब्रुवारी १७११.
राजश्री रामचंद्र पडित अमात्य यांसी-
प्रति श्रीमंत मातुश्री ताराबाई. उपरि. तुह्मीं पत्रें पुरविण्या ३ तीन पाठविल्या त्या प्रविष्ट झाल्या. त्यामध्यें लिहिलें कीं, सातारियास राजश्री केसो त्रिमल आहेत, त्यांकडे राजकारण करून खल करून पहावा. याकरितां राजश्री हिंदुराव व राजश्री गिरजाजी यादव यांचे विद्यमानें पत्र पाठविलें आहे , कीं तुह्मीं मातुश्री साहेबांचे पायांसी निष्ठा धरून ज्या स्थळीं आहां तें स्थळ हस्तवश करून देणें, आणि आपला मजुरा करून घेणें. येवढें कार्य संपादिलियावर तुमचे नातू, निळोपंताचे स्त्रीचे पदरी घातले आहेत, त्यास पेशवाई द्यावी. तुह्मी सर्वस्वें कारभार करावा येविषयीं आह्मी धण्याजवळी विनंती करून अभीष्ट सिद्धीस पावितों ह्मणून विशदर्थे पत्र पाठविलें आहे. त्यांचे पुत्र राजश्री बाबूराव केशव याकरवीं लेहविलें आहे. जरी साहेबाचे पुण्येंकरून तिहीं हात दिल्हा तरी मातबर स्थळ हस्तगत होतें, फिरोन मनसचाच उभा राहतो, याकरितां पत्रें पाठविली आहेत. ह्मणून लिहिलें तें अक्षरशा विदित जाले. तुह्मीं जो खल अगर श्रम कराल तो आमच्या स्वहिताचाच कराल, यदर्थी सर्वविषयीं भरोसा तुमचा मानिला आहे. याकरितां तु्ह्मीं जीं पत्रें पाठविलीं तीं उत्तम पाठविलीं. त्याणीं निष्ठा धरून कार्यसिद्धि केली. यावरी त्याचे अभीष्ट तुमचें वचनाप्रमाणें सिद्धीस पाविलें जाईल. राजश्री त्र्यंबक शिवदेऊ मुतालीक दिमत सचीव याचें अनुसंघान राजश्री केसो महादेव व रामचंद्र महादेव यांणीं सांगोन पाठविलें, कीं त्र्यंबकपंतीं स्वामीच्या पायासी निष्ठा धरिली आहे, कीं सांप्रत सैन्यांत आहेत, तेथून आपल्या जिल्हेस जावें आणि स्वामीचे पदरी पडावें, गड किल्ले आदिकरून हस्तवश करून घ्यावे. ये गोष्टीस गड किल्ले तूर्त नातवान पडिले आहेत त्यांचे बेगमीस दहा हजार रुपये द्यावे, आणि आपणास सरकारकुनीचा हुद्दा दबीरी अगर वाकेनिसी द्यावी म्हणून व येविषयी खासा त्याचें पत्र संकलितार्थे आलें त्यावरून राजश्री हिंदुराव व राजश्री गिरजाजी यादव ऐसे बसोन ये गोष्टीचा विचार करून त्र्यबक शिवदेऊ यासी समाधानाचें पत्र पाठविलें द्रव्य द्यावें, त्यास चार सहस्त्र रुपयांची हुडी महादाजी कृष्ण याजकडे करून पाठविली राहिलें द्रव्य कार्य सिद्ध होतांच द्यावे ऐसा निर्वा शफतपूर्वक करून दिला. सरकारकुनीचा हुद्दा साहेबाचे आज्ञेवेगळा मात्र करिता नये याकरितां उभयतानी आग्रह केला की, हातीचे राजकारण जाऊ देऊ नये याकरितां तुह्मी वाकेनिसी देतो ऐसें पत्र शफतपूर्वक तुळसी ऐसें पाठवणें हुद्याविषयी मातुश्री साहेबास आह्मी उभयता अर्ज करवून देऊं ह्मणून त्यावरून याप्रमाणें पत्रें पाठविली. जरी साहेबाचे पुण्येंकरून हे गोष्टी संपादिली ह्मणजे थोर कार्य जालें शाहूराजेयाची कमरच मोडोन हतप्रभ होऊन जाताती. ह्मणून विशदर्थे लिहिले, कीं हुद्याविषयी व द्रव्याविषयीं वचन गुंतलें आहे, खरें करावें लागेल ह्मणून. तरी, जी गोष्टी तुह्मीं योजिली, ते उत्तम आहे. आमचें राज्य सुरक्षित जालें. ज्याणीं या समयांत सेवा केली त्याचें गोमटें न करावें तरी कोणाचे करावें ? त्यामध्यें तुम्हासारिखे लोक मध्यस्त असतां तुमचें वचन गुंतले तेंच आमचें वचन. ये गोष्टीस अन्यथा होतें ऐसे नाहीं. त्र्यंबक शिवदेऊ याणे लिहिल्याप्रमाणें कार्यसिद्धि अविलबे केली, गडकिल्ले हस्तवश करून दिले, ह्मणजे तुमच्या वचनाप्रमाणें वाकेनिसीचा हुद्दा सांगितला जाईल, व द्रव्याची अनुकूलता केली जाईल. परंतु करितां कार्य त्वरेनें करावें. जों लष्कर प्रसिद्धगडा खाले आहे तों कार्य जाल्यानें पायेबंद बसोन बाजू सावरते. याकारणें त्वरा होय ऐसी गोष्ट करणें.