[ ६३ ] श्रीरामोजयति. २९ मार्च १७०८.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शक ३४ सर्वधारी संवत्सरे चैत्रबहुल पंचमी भोमवासरे क्षत्रियकुलावत्तंस श्रीराजा शाहूछत्रपति स्वामी याणीं समस्त राजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री नारो पंडित यासी आज्ञा केली ऐसी जे - तुह्मीं आपलें वृत्त विस्तारें रा। गीरजोजी पिसाळ यास लिहून पाठविलें होतें तें पत्र बजिन्नस त्यांणीं स्वामीचे सेवेसी पाठविली. यावरून लिहिला आशय विदित जाहला. त्याचा सारांश हाच कीं, आपणास बंधूचा आग्रह सिंधुदुर्गास जावें, व तेथून आमंत्रणही साक्षेपयुक्त आलें आहे त्यास, आपला निश्चय स्वामीसमीप यावें याकरितां लोकांची स्वारी पाठऊन घेऊन जाणें ह्मणून लिहिलें. त्यावरून तुमचे निष्ठेचा अर्थ कळोन स्वामी संतोषी जाहले तुह्मीं पुरातन लोक, स्वामीचे ठायीं आर्त धरितां, तुमचा संग्रह करून चालवावें, यापेक्षां स्वामीस आवश्यक तें काय आहे ? प्रस्तुत, हें पत्र तुह्मांस लिहिले असे. तरी गिरजोजी पिसाळ याजकडील लोक तुह्मास बलावण्यासं पाठविले आहेत. तुह्मीं स्वार होऊन अवलिंबें दर्शनास येणें. तुमचे बहुमान गौरवास अंतर होणार नाहीं. प्रयोजन प्रसंगाचा अर्थ तुह्मीं कितीक लिहिला होता तरी तुह्मी कार्यभाग करावे, आणि स्वामीस संतोषी करावें, हे उचित आहे तदनुरूप दर्शनास येऊन स्वामीस संतोषी करून आपला मनोदय सिद्धीस पाववून घेणें जाणिजे बहुत लिहिणें तर तुह्मीं सुज्ञ असा.
मर्यादेय राजते.