[ ६१ ] श्री आई आदिपुरुष १७०८.
विनति उपरि. स्वामींनीं दया करून राजश्री नरसिहपत व तिमाजीपंत व धनाजी घाटगा याजसमागमें पत्र पाठविलें. कितेक स्वमुखें निरोप सांगोन पाठविला आहे. तें केवळ आपलीं वचनें हे सांगतील ते ह्मणून स्वामीनी लिहिलें. पत्रार्थ व निरोप एकोन बहुत समाधान झालें. स्वामीच्या निरोपाचें प्रतिउत्तर त्रिवर्गाजवळ सांग सांगितलें आहे. तें निवेदन करितां वित्तारूढ होईल स्वामीनीं आज्ञा सांगोन पाठविली तदनुरुप श्रीवरील पुष्पें व रोटी ऐसी शपथ पाठविली आहे. स्वामीनीं एक तिळतुल्य चित्तांत आनसारिखी गोष्टी येऊ न द्यावी. आमचें चित्त निखालस स्वामीच्या पायाशी आहे. परिणामीही कळों येईल हें जीवित आहे तें केवळ स्वामीच्या अन्नाचें आहे त्याहीमधें ह्या प्रसंगीं केवळ आमच्या जीवाचेंच आदान होतें. परंतु स्वामी प्रसंगी होते. स्वामीनीं दया करून प्राण वांचविला. हे गोष्टीचा कृतोपकार आहे जोंवरी आयुष्य असेल तो विसार पडणार नाहीं. स्वामीनीं आमचा सर्वस्व अभिमान धरिला तरी जें आमचें वंशजपण असेल तदनुरुप उत्तीर्ण होऊन श्री करील तरी स्वामीची कीर्ति दिगंतरी प्रसार व्हावी ऐसाच अर्थ होईल हे स्वामीस पूर्ण भरवसा असावा याउपरी स्वामींनीं कांही मनात संदेह येऊ नेदून पत्री सदेहास्पद लिहित न जावें. स्वामीचें उत्तमपण आहे, ते स्वामी करितात. आह्मीं अधम कृति चित्ती आणिली ती इहलोकीं निंद्य. परलोकी तो विश्वासघातकाते, नरो नरकं याति यावत् चंद्र दिवाकरौ, हा प्रसंग जो अधमपणा करील त्याचे पदरीं पडेल. स्वामीनीं विमलहस्तें श्री पूजिला आहे तावत्कालपावेतो अभिमान आहेच. ऐसा प्रसंग आहे. याविसीं विशद लेखन करावें तरी पत्रार्थ विशेष वाढतो. राजश्री रायभानजी राजे व आपण हे गोष्टी अंगीकार केला आहे, यामुळें बहुताचे द्वेष पडतात पदरीं ह्मणून स्वामीनीं लिहिलें, तरी राजश्री रायभानजी राजे आणि स्वामी ऐसे आह्मीं दोन्ही लक्षीत नाहीं. त्याहीमध्यें या प्रसंगीं त्याहीं दया केली. याहून उत्तम तें काय आहे ? उभयतांनीं हे गोष्टी अंगिकारिली. स्वामीस ऐसें पुरतें चित्तांत येऊं द्यावें कीं, या गोष्टीनीं स्वामीची व त्यांची कीर्ति बहुत होते आणि स्वामीनीं आपला पाठिबा उभा केला, ऐसें चित्तांत येऊं द्यावें. वरकडीचे द्वेष पदरीं पडतात, ह्मणून लिहिलें तरी श्री समर्थ आहे. स्वामी आह्मीं आणि राजश्री रायभानजी राजे ऐसे एकचित असतां जरी आभाळ पडत असेल त्यास हात देऊं. तेथें वरकड प्रसंग ते काय आहेत ? स्वामीस काय न कळेसा प्रसंग आहे तो विशद लेखन करुं ! स्वामीनीं तो तैक्कल आमचेविशीं केलेंच आहे. त्यास श्रीस्वामींस उत्तर काय ? यश पदरीं घालेत ऐसा पुरता भरंवसा असो दिला पाहिजे. आपण स्वारीस मल्हारराऊ सेना घेऊन चिपळुणास येणार. याजनिमित्य जातो ' तुह्मीं आहां तैसें पंधरा दिवस असणें, बहुतसा राबिता होऊं न देणें, या दोनीच्या विचारे असिले पाहिजे ', ह्मणून स्वामींनी लिहिलें तरी, स्वामीनीं पूर्वी जे रीतीनें ठेविलें त्या रीतीनें दोन मास क्रमिले. याउपरी जे रीतीनें आज्ञा केली तदनुरुप रहाटी करून परंतु स्वामीची दया जालियाउपरी किंचित् भाग राहिला तो राहूं देणें हें उचित नाहीं. वरकडाचे उपरोध स्वामीनीं किमपि चित्तांत येऊं न द्यावें याहींमध्यें जे स्वामी आज्ञा करितील तदनुरूप रहाटी केली जाईल. स्वामीनीं लिहिलें कीं, आठ पंधरा दिवस. त्यास हें पत्र स्वामीपाशईं पावे, तों आठ दिवस जाले. एका शब्दाचा तो नियत वारला. दुसरे शब्दास आठ दिवस अवकाश राहतो यामधें स्वामीस श्री प्रेहरील तें करावें, परंतु आतां उचित आहे कीं , आमचा श्रम परिहार सत्वर करावा हें उचित आहे स्वामीनीं लिहिलें कीं, भोजन करून खुशाल असणें तरी , स्वामीची दया जाली तेधवां खुशालच आहों. भोजन श्रीचे आणि स्वामीचे पाय पाहूं तेधवा होईल. फराळ घेतों. खुशाल स्वामीचे पत्र पाहून आहों वरकड साकल्य वर्तमान त्रिवर्ग सागतां कळों येईल, कृपा असो दीजे. हे विनति.