[ ६० ] श्री आई आदिपुरुष १७०८.
विनंति उपरी. स्वामीनी लिहिलें कीं, कितेक विचार सुचत जाईल, तो लिहून पाठवीत जाणें. ह्मणून लिहिले कीं, स्वामी वडील आहेत दया करुन जें लिहिलें ते मनांत दयाच येऊन लिहिले श्री स्वामीस सुचला विचार आह्मीं ल्याहावा हे आह्मांस अधिकारच आहे. स्वामीच्या यशे राजियाचें कल्याण. त्यामुळें आह्मीं अवघे सुखी. आज्ञेप्रमाणें कितेक विचार सुचला, तो त्रिवर्गापाशीं सांगितला आहे, ते निवेदन करितील त्यामधें जो उपेगाचा असेल तो मनास आणावा नसेल तो राहूं द्यावा. शामळासी सख्य कोणे रीतीनीं करावें ह्मणून लिहिलें तरी शामळ सलियास तूर्त येतो, हे तो दिसत नाहीं. कदाचित् आलाच तरी चौथाई देऊं करावी, आणि तह करावा, याहीमधें प्रसंग पाहून जें कर्तव्य तें करावें कबिला सिहगडीहून आणावा, कीं तूर्त न आणावा ह्मणून लिहिलें. तरी सिंहगड आपले हातीं असेल तरी चार दिवस कबिला आणूं नये. एक स्वारी मात्र आणावी पुढे वेळ पडेल त्यासारिखें करावें. राजश्री नरहरिपंत देखील तेथेच असों देऊन ते जागा आपल्या हातीं असो द्यावा. कुल अवघे वळण त्यातोंडें पडणार. गनीम विशाळगडास यंदा येतो, यास संदेह नाहीं. तेधवा दुसरा जागा सरदारी करावा ऐसा नाहीं. याजकरिता हा विचार स्वामींनीं मनांत आणून जें कर्तव्य तें करावें. आह्मास सुचल्यासारिखे लिहिलें आहे. कृपा असो दीजे. हे विनंती, स्वामीनीं चिरंजीव आपाची बेडी तोडविली ह्मणून लिहिलें तरी सर्व संकट स्वामीसच आहे. चिरंजीव माधवरायाचीही बेडी तोडविली स्वामींनीं असेल. सकलही मान अपमान आमचा स्वामीस आहे. विशेष काय लिहिणें. हे विनंति.