[ ५९ ] श्री. ७ ऑक्टोबर १७०७.
˜ ° श्री˜शिवनरपति हर्षनिदान । मोरे- श्वरसुत नीळकंठ प्रधान |
˜ ° श्रीआईआदिपुरुष श्रीराजाशिवछत्रपति स्वामी कृपानिधि । तस्य परशुराम त्र्यंबक प्रतिनिधि |
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३४ सर्वजित् संवत्सरे कार्तिक बहुल नवमी भृगुवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शिवछत्रपति याणीं राजश्री सूर्याजी इंगळे मुद्राधारी जंजिरे विजयदुर्ग यासी आज्ञा केली ऐसी जे - जंजिरे मजकुरी जिभीमध्यें राजश्री नारो पंडिच यांचा वाडा आहे. तेथें त्याणीं आपले कारभारी वेदमुर्ति रघुनाथभट्ट ठेविले आहेत. ऐशियास तुह्मीं त्यास ह्मणता जे, तुह्मीं आणखे ठाई राहणें, तें घर नामजाद लोकांस रहावयास देणें तरी ऐसी गोष्ट ह्मणायास तुह्मांस प्रयोजन काय आहे ? पंडित मशारनिल्हे हुजूर दर्शनास आले होते. यांस स्वामीनीं मागती जंजिरे मजकुरास जावयाची आज्ञा केली आहे. हे येऊन आपल्या वाडियांत राहतील यांच्या परामर्षास अंतर पडो न देणें. याकडे पहिलेपासून जंजिरे मजकुरपैकीं नोबती दोघेजण होते, तैसे पुढें यांकडे असों देणें. पंडित मा। निल्हे आपल्या वाडियाच्या जाग्यावरी श्रीचें देवालय लहानसें बांधणार आहेत. त्यास अलिगौडा देवालय बांधायाच्या कामास नेहमीं यांकडे देविला असे. तरी देवालय मुस्तेद होय तोंवरी अलिगौडा यांकडे देणें त्याचा रोजमुरा जंजिरे मजकुरपैकीं पावतो तैसा पाववीत जाणें. जंजिरे मजकुरीं आगत्यागत्य कार्य प्रयोजनास गौडा पाहिजे. तरी पंडित मा।निल्हेस सांगोन पाठवीत जाणें. हे पाठवून देत जातील व यांच्या दोन बागा आहेत. त्या कांहीं कोणाचा उपसर्ग लागो न देणे. बागाखालील जमीन जे आहे त्यांत कोणी शेत पोत करील तरी यांचे आज्ञेखेरीज करूं न देणें. लेखनालकार.
मर्यादेयं विराजते.