पुढें वळणदार अक्षरचरणकांनीं ह्या वक्राला पुष्टी आणून त्याचें ढेर बनविलें, व ह्या ढेराला पेलण्यास वरती एक भली मोठी पोकळ गांठ तयार केली, आणि दोन्ही काने एकदम लिहिण्याची सफाई सुरू केलीं. येणेंप्रमाणें बनत बनत सध्यांचा अगडबंब सा बनला आहे. ह्या अगडबंब साचेंहि एक दुसरें रूपान्तर झाले आहे. गाठ काढून टाकून व काने पिरगाटून कांहीसा निठव्याप्रमाणें ळकारासारखा एक सा काढीत असतात. ह्या सत व ळत फरक इतकाच कीं, ळचे दोन्ही जुवे घट्ट बसलेले असतात व साचे अगदीं उघडे असतात; आणि ळची उभी रेघ सांत आडवी मारतात. हा दुपोटी सा मूळ देवनागरी सापासून फारच रूपान्तरित आहे. परंतु हे रूपान्तर एकाएकीं मात्र प्राप्त झालेलें नाहीं. ह्याला फार काळ व बरीच मेहनत पडलेली आहे. हें शेवटलें रूप बनवायला सहाशें वर्षांचा अवधी व अनेक कलमबहादरांची हातचलाखीं लागलेली आहे! हाच प्रकार इतर अक्षरांचा आहे. इ. स. १४१६ पासून १८५० पर्यंतच्या पंचवीस तीस मोडी पत्रांचे फोटोझिंको देतां आले असते, तर हें विवेचन जास्त स्पष्ट झालें असतें.
८. शिवाजीच्या पत्रांसंबंधानें दुसरी विचार करण्यासारखी बाब म्हटली म्हणजे भाषेसंबंधीची आहे. प्रस्तुत खंडांतील पहिला लेखांक विजापुरांतील सर्वश्रेष्ठ कारभारी जो दियानतराव त्यानें निळोपंत बहुतकर यांस पाठविलेला आहे. ह्या दियानतरावाचा उल्लेख काव्येतिहाससंग्रहान्तर्गत पत्रेंयादींतील ४३८ व्या लेखांकांत म्हणजे शहाजी महाराजांच्या कैफियतींत प्रारंभीच आला आहे. हा दियानतराव देशस्थ ब्राह्मण असून दियानतराव हा ह्याचा बहुशः किताब आहे. दियानत् ह्या फारशी शब्दाचा अर्थ धर्म. अर्थात् दियानतराव म्हणजे धर्मराव किंवा सार्थ धर्माजीराव. आतां धर्मराव किंवा धर्माजींराव ह्या शब्दाचा दियानतराव असा फारशींत तर्जुमा होतो, तेव्हां दियानतराव हा किताब आहे किंवा हुएन्संग संस्कृत विशेषनामाचे जसे अर्थावरून चिनी तर्जुमे कधीं कधीं करतो, त्याप्रमाणें मूळ मराठी नांवाचा हा फारशी तर्जुमा आहे, हें निश्चयात्मक सांगतां येत नाहीं. हा प्रकार कांहीं असो, इतकें मात्र स्पष्ट आहे कीं, त्या कालीं ब्राह्मणहि फारशीं नांवे स्वीकारण्यांत फुशारकी मानीत असत. सर्जेराव, बाजीराव, हैबतराव, जानराव, फिरंगोजीराव, शहाजीराव, सर्फोजीराव, दर्याजीराव, मलंगोजीराव, गुलबाई वगैरे फारशींतून आलेल्या मराठी नांवांप्रमाणें दियानतराव हेंहि मराठींत त्या कालीं रूढ झालेलें नांव होतें. हा खुलासा पत्र लिहिणा-याच्या नावांसंबंधानें झाला. आतां ह्या पत्रांतील शब्द व प्रयोग ह्यांच्याविषयींचा खुलासा करतों. ह्या लेखांकांत एकंदर ९१ शब्द आहेत, त्यांपैकीं बराबर ३० शब्द फारशी आहेत आणि एकंदर वाक्यप्रयोग फारशी प्रयोगांच्या धर्तीवर आहेत. ९१ शब्दांपैकीं अस्सल फारशी ३० गाळले असतां, बाकी जे ६१ शब्द राहतात, त्यांतून दोन तीन शब्द खेरीजकरून बाकी सर्व शब्द फारशी शब्दांचे मराठी तर्जुमे आहेत. मायन्यांतील अखंडित- लक्ष्मीप्रसन्न व परोपकारमूर्ति हे शब्द दामदौलतहू व मुषफिकमेहेरबान् ह्मा शब्दांचे हुबेहुब तर्जुमे आहेत; आणि राजमान्य, राजश्री, गोसावी, यांसी हे चार शब्द शुद्ध मराठी आहेत. कोणत्याही फारशी मायन्यांतील शब्दांचें भाषान्तर नाहींत. आतां मायना सोडून देऊन खालील पत्राकडे वळूं. ह्या पत्रांत एकंदर दहा वाक्यें आहेत. पैकीं पहिल्या वाक्यांतील सेवक हा शब्द बंदा ह्या फारशी शब्दाचें भाषान्तर आहे. संस्कृत नाटकांत जीं कांहीं पांच चार पत्रें सांपडतात, त्यांतींल मायन्यांत सेवक हा शब्द कोठें आलेला आढळत नाहीं. हेमाद्रीच्या वेळच्या मराठींतील किंवा त्याच्या पूर्वीच्या महाराष्ट्रांतील पत्रव्यवहाराचा एकहि मासला उपलब्ध नसल्यामुळें म्हणजे मुसुलमानांचा प्रवेश महाराष्ट्रांत होण्याच्या पूर्वी मराठींत किंवा महाराष्ट्रांत पत्रांचे मायने कसे लिहीत असत तें नक्की सांगतां येत नसल्यामुळे, सेवक हा शब्द मायन्यांत योजण्याचा प्रघात जुन्या मराठीपासून किंवा तत्पूर्वीच्या महाराष्ट्रींपासून चालत आला किंवा नाहीं हें काहींच ठरवितां येत नाहीं.