येणेंप्रमाणें ज्ञानेश्वरांच्या वेळेस लिहिण्याच्या कामीं कागद प्रचारांत येऊ लागले होते, हें स्पष्ट आहे. ही गोष्ट केवळ अनुमानानेंच सिद्ध आहे असें नाहीं ज्ञानेश्वरांचा समकालीन किंवा किंचित् प्राचीन जो मुकु्दराज त्याच्या विवेकसिंधूची मूळ अस्सल प्रत जोगाईच्या आंब्यास मुकुंदराजाच्या शिष्यशाखेकडे आहे व ती कागदावर लिहिलेली आहे. ह्या मूळ प्रतीवरील अक्षरें तेराव्या शतकांतील जाधवांच्या शिलालेखांतील अक्षरांप्रमाणें असून तीं मुकुंदराजाच्या सध्यांच्या शिष्यांना, बाळबोध लिहिलीं असूनहि, वाचतां येत नाहींत, असें सांगतात. ह्यावरून
इतके सिद्ध होतें, कीं मुकुंदराज व ज्ञानेश्वर ह्यांच्या वेळीं लिहिण्याच्या कामीं कागदाचा अंशतः उपयोग लोक करू लागले होते. ताडपत्रें, भूर्जपत्रें व वस्त्रपट ह्यांचाहि उपयोग होत होताच. परंतु ह्या नवीन जिन्नसाकडे लोकांची प्रवृत्ति बरीच पडत चालली होती. ही प्रवृत्ति मुकुंदराज व ज्ञानेश्वर ह्यांच्या पूर्वी, इतकेंच नव्हे तर, हेमाडपंताच्याहि पूर्वी पांचपंचवीस वर्षे, होत होती. अशावेळी दफ्तरावरील मुख्याधिकारी जो हेमाडपंत त्यानें मोडी लिपी महाराष्ट्रांत नव्यानें सुरू केली. ह्या मोडी लिपीचाहि उल्लेख ज्ञानेश्वरानें वरील उता-यांतील पहिल्या ओवींत केला आहे असें दिसतें. पंतोजी अक्षर वेगानें लिहितो, ह्मा वाक्यांतील वेगानें हें पद विचारणीय आहे. बाळबोध अक्षर वेगानें लिहितां येत नाहीं. तेव्हां त्यासंबंधानें वेगवंत हा शब्द योजण्यांत काहीं विशेष अर्थ नव्हता. तो मोडी अक्षराच्यासंबंधानें मात्र सार्थ आहे. ह्यावरून असें दिसतें कीं ज्ञानेश्वरीच्या पूर्वी मोडी अक्षर प्रचारांत आलें होतें. ज्ञानेश्वरी इ. स. १२९० म्हणजे शके १२१२ त लिहिली गेली. त्यापूर्वी तीस चाळीस वर्षे म्हणजे इ. स. १२६० पासून पुंढे हेमाद्रि जाधवांचा दफ्तरदार होता. हेमाद्रि दफ्तरदार होण्याच्या वेळीं उत्तर हिंदुस्थानांत मुसुलमानांचे राज्य होऊन ऐंशी नव्वद वर्षे झाली होतीं. सिंघण राजानें माळवा वगैरे विंध्याद्रीच्या पलीकडील प्रांत जिंकले होते. तेव्हां मुसलमानांची उर्फ म्लेंछांची ओळख मराठ्यांना झाली होती. ही ओळख होत असतांना, मुसुलमानांची कागद करण्याची कला महाराष्ट्रांत सुरू झाली व ही सुरू झाल्यावर मोडी लिहिण्याची पद्धत हेमाद्रीला सुचली. ही मोडी लिहिण्याची पद्धत हेमाद्रीनें मुसुलमानांच्या शिकस्ता नामक लेखनपद्धतीवरून घेतली. फारशींत लिहिण्याच्या पद्धती अनेक आहेत. त्यांत नस्ख व शिकस्ता ह्या आपल्या इकडील बाळबोध व मोडी ह्यांच्याशीं जुळतात. नस्ख अक्षर बाळबोधाप्रमाणें स्पष्ट व सुव्यक्त असें लिहितात व शिकस्ता अक्षर मोडून लिहिलेलें असतें. फारशींत शिकस्तन् ह्या क्रियापदाचा अर्थ मोडणें असा होतो. जलदीनें लिहिण्यातं खडें अक्षर मोडून लिहिण्याचें जें वळण त्याला फारशींत शिकस्ता म्हणतात. मोडी हा शब्द फारशी शिकस्ता ह्या शब्दाचें हुबेहूब मराठी भाषांतर आहे. मोडी ह्या अर्थाचा वाचक शब्द संस्कृतांत किंवा महाराष्ट्रींत नाहीं. हा शब्द हेमाडपंतानें फारशी शिकस्ता ह्या शब्दाच्या अर्थाकडे लक्ष देऊन मराठींत अक्षर लिहिण्याच्या एका पद्धतीला नव्यानें लागू केला. हेमाडपंतानें अक्षर लिहिण्यांत ही नवी सुधारणा केली. तोपर्यंत महाराष्ट्रांत सर्व लेखी व्यवहार बालबोध अक्षरांत होत असे. ह्या नवीन सुधारणेवरून ही एक गोष्ट ध्यानांत धरण्यासारखी आहे कीं, महाराष्ट्रांतील विचारी पुढारी लोक परदेशस्थांची एखादी चांगली रीती उपयोगी असल्यास ती स्वीकारण्यास फार पुरातन कालापासून तयार असतात. इ स १२५० च्या अगोदर म्हणजे हेमाद्रीच्या पूर्वी शंभर दीडशे वर्षे महाराष्ट्राच्या उत्तरेस हिंदुस्थानांत मुसुलमान आले असतां त्यांच्या शिकस्ता लिहिण्याच्या त-हेवरून ब्रज भाषा मोडीनें लिहिण्याचा प्रचार तिकडील विचारी पुरुषांनीं पाडलेला दिसत नाहीं. व महाराष्ट्रांत मोडी लिहिण्याचा प्रघात आज साडेसहाशें वर्षे चालू असतां भरतखंडांतींल इतर कोणत्याहि भाषेला हा प्रघात उचलण्याची आवश्यकता दिसली नाहीं. गुजराथी वगैरे इतर भाषांत पत्रें वगैरे रोजच्या व्यवहारांतील लिखाण किसबीड अशा मूळ बिनओळीच्या बाळबोध अक्षरांनीच करतात. मोडी हा शब्द फारशी शिकस्ता ह्या शब्दांचे भाषांतर आहे.