अनेक कलमांचा कित्ता या शब्दानें प्रारंभ झाला आहे. परंतु हा कित्ता कोणत्या मूळाचा त्याचा पत्ता नाहीं. सर्व कलमें मूळांतल्याप्रमाणें दिलेली आहेत किंवा नाहीं ह्याचा खुलासा नाहीं. मूळ रोजनिशी केवळ जावक पत्रांची आहे, हें छापील रोजनिशीचीं सर्व कलमें तपशिलीं असतां स्पष्ट होतें. मूळपत्रांचा जावकांत कारकुनांनी संक्षेप किती केला ह्याचा सापेक्ष तपशील संपादकांनी दिला नाहीं. तसेंच मूळरोजनिशींतून व इनाम कमिशनाच्या रोजनिशींतून कोणतीं कलमे गाळलीं व तीं कोणत्या धोरणावर गाळलीं ह्याचाहि खुलासा झाला नाहीं. अशा नाना प्रकारच्या शंका ह्या रोजनिशीसंबंधानें उद्भवतात. एकंदरींत ही रोजनिशी पाहून माझें असें मत झालें आहे कीं, शाहू छत्रपतीची मूळ रोजनिशी जशीची तशीच छापिली असती व त्यांत संक्षेप किंवा विस्तार यत्किंचितह केला नसता, तर फार उत्तम गोष्ट होती. जे जे कोणी ही छापील रोजनिशी साक्षेपानें वाचतील व इतरत्र उपलब्ध झालेल्या अस्सल माहितीशीं ती ताडून पाहतील त्यांना मूळ रोजनिशी जशीची तशी छापिली नाहीं, ह्याबद्दल फार खेद वाटेल. ह्या रोजनिशीला अर्थनिर्णायक म्हणून एक कोश! दिला आहे. त्यात ब-याच शब्दांचें अर्थ चुकले आहेत* व खरोखर कठीण व दुर्बोध अशा शब्दांचा मुळी उल्लेखच नाहीं. सारांश ऐतिहासिक लेख छापण्याचे बहुतेक सर्व जगन्मान्य नियम ह्या रोजनिशीने मोडले आहेत.
(* कोशातील कित्येक चुकलेले शब्दार्थ व त्याचा खरा अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
४. ही रोजनिशी न्यायमूर्ती रानडे यांच्या अनुमतानें झाली असें ऐकिवांत आहे. न्यायमूर्तीनीं ह्या रोजनिशीवर एक निबंधहि एशिआटिक सोसायटीपुढें वाचलेला प्रसिद्ध आहे. परंतु एवढ्यावरून ऐतिहासिक साधनें कोणत्या पद्धतीने तयार करावीं व छापावीं ह्याचा तपशिलवार मसुदा त्यांनी रा. वाड यांस करून दिला होता असें म्हणणें मुष्किलीचें आहे. रा. वाड हे ब-याच वर्षांचे पदवीधर होते, तेव्हां हें काम ते चोख करतील, असा न्यायमूर्तीचा समज असावा. परंतु रा. वाड ह्यांचा हा व्यासंग नसल्यामुळें ऐतिहासिक साधनांच्या व्याप्तीचा अंदाज करण्याची ताकत त्यांना आली असण्याचा संभव फारच थोडा होता. खरें म्हटलें म्हणजे शाहूमहाराजांची जी मूळ अस्सल रोजनिशी आहे ती संक्षेप किंवा विस्तार न करतां जशीच्या तशीच छापिली पाहिजे होती. एखादें नांव चुकलें, एखादी तारीख वाकडीतिकडी पडली, तर केवढा घोटाळा होतो तो तज्ज्ञांना माहीत आहे. ह्या गोष्टीचा अंदाज डेक्कन ट्रान्सलेशन सोसायटीचे अध्यक्ष जे डॉ. भांडारकर त्यांना उत्तमोत्तम होणार आहे. बारकाईनें प्राचीन लेख तपासण्याच्या व अस्सल व नक्कल ह्यांच्यांत किती अंतर असतें हे पहाण्याच्या पद्धती त्यांना अवगत आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखालीं चालणा-या संस्थेच्या हातून असले गबाळ ग्रंथ बाहेर पडावे, ही मोठ्या खेदाची गोष्ट होय.
५. माझ्या मतें जुने ऐतिहासिक लेख येणेंप्रमाणें छापावे. (१) प्रथम, लेख जसेच्या तसे शुद्ध छापावे. (२) ते मिळाले कोठून, ते अस्सल आहेत किंवा नक्कल आहेत, ते आहेत कोणत्या स्थितींत, वगैरे माहिती पूर्ण द्यावी. (३) त्यांतील कठिण व दुर्बोध एकोनएक शब्द व वाक्यें छानून तपासावीं व त्यांचा अर्थ द्यावा. (४) त्यापासून अनुमानें काय निघतात तें मुद्देसूद लिहावें, (५) व शेवटीं त्यापासून संगतवार वृत्तांत काय निघतो ते दाखवावें.
६. प्रस्तुत खंडांत छापिलेलीं बहुतेक पत्रें अस्सल आहेंत. तीं मिळालीं कोठून हें उपोद्धातांत सांगितलेलें आहे. आतां ह्या उपप्रस्तावनेंत दुर्बोध स्थलें विशद करण्याचा व पत्रांतील मजकुरापासून अनुमानें काय निघतात तें दाखविण्याचा मनोदय आहे; व शेवटी त्यापासून संगतवार वृत्तान्त काय निघतो तें पहावयाचें आहे. पैकीं शिवाजी, संभाजी, राजाराम व धाकटा शिवाजी ह्यांच्यासंबंधीं संगतवार वृत्तांत देण्याचा समय अद्याप आला नाहीं. आणीक एक दोन खंडांत ह्या कारकीर्दीसंबंधानें लेख यावयाचे आहेत तें आल्यावर संगतवार वृत्तांत मुख्य प्रस्तावनेंत देतां येईल. बाकी राहिलेल्या कोल्हापूरच्या संभाजीसंबंधानें व बावडेकरांच्यासंबंधानें मात्र संगतवार वृत्तांत येथें देण्यास हरकत नाहीं.