[ ४७ ] श्री. १६९५.
राजश्री पंत अमात्य स्वामीचे सेवेसीः-
सकळगुणालकरण अखडितलक्ष्मीअलकृत राजमान्य स्नेहाकित सताजी घोरपडे सेनापती जप्तनमुलूक दंडवत विनंति, येथील कुशल तो। प्रताप स्वामीचा जाणऊन स्वानंदवैभवलेखन केलें पाहिजे विशेष स्वामीनी राजश्री सेखोजी बरगे व बाजी शिंदे याजबरोबरी कितेक बुद्धिवाद सागोन पाठविला की - आपली भेट घेतली नाही परस्पर निघोन गेलेत ह्मणून शब्द लाविला ऐसियास, स्वामीची आमची क्रिया ऐसी नाहीं जे स्वामीसी द्वैतभाव धरावा. आह्मीं त्याप्रातें असतां दहाविसांचे साक्षीनसी ऐकिलें कीं सताजी घोरपडे यास त्याप्रांतें ठेवून राजश्री धनाजी जाधवराऊ यांस पाठवून देणें. ह्मणवून पत्रे राजश्रीस लिहिलीं. त्यावरूनच द्वैतप्रकार दिसून आला . स्वामीचे आज्ञेवितरिक्त आह्मीं कांहींच नव्हतों. विश्वासाची जाती ह्मणावी तरी स्वामीचे आमचे शफत तुळशीबेलाचे श्रीवरील आहे. स्वामीचे मांडीवरी आह्मी उसें ठेवून निजावें, आमचे मांडीवरी स्वामींनीं ठेवावें, शरीर मात्र भिन्न, आत्मा एक, ऐसें असतां ही गोष्ट द्वैताची होऊन आली. ह्मणूनच वीतरागें येणें जालें. गत वर्षापासून श्रमाची जाती ह्मणावी तर कागदीं लिहितां पुरवत नाहीं. बरे । जे गोष्टी जाहाली ते जाहाली. याउपरि त-ही राज्यांत डोहणा न होय तो पदार्थ केला पाहिजे द्वैतभाव दिसोन आला होता ह्मणऊनच येणें जाहालें होतें. त्यास, राजश्री सेखोजी बरगे व बाजी शिंदे यांजपाशीं स्वमुखें सागितलें कीं, आपण कांहीं संताजीस ठेवून घेऊन धनाजी जाधवराऊ यास पाठविणें. ऐसें लिहिलें नाहीं. ह्मणऊन शफतपूर्वक सांगितलें. त्यावरून बाजी शिंद्याचे साक्षीनसी मशारनईलेनीं आह्मांस सांगितलें. वरकडहि कितेक भावार्थ व मानाजी मो-यांचें वर्तमान व आणिखी स्नेहाची उत्तरें सांगोन पाठविली. त्यावरून द्वैताची गोष्टी होती ते स्वामीचेच वचनावरून दूर केली. आह्मीं लोकांचे बळें द्वैत धरिलें होतें. तें आह्मापासूनच अंतर पडलें. आपणहि त्या गोष्टीचा कांहीं मनांत विकल्प धरिला न पाहिजे. आणखी स्वामींनीं एक शब्द लाविला की, राजश्री छत्रपति स्वामीची भेटी जाहाली ते समयीं बहुमान जाहाला, तेव्हां आमचा मान काढिला नाहीं. ह्मणऊन शब्द लाविला. ऐसियासी, राजश्री छत्रपति स्वामींची व आमची जीं वचनें स्वामीचे सीहुरसीचीं जाहालीं. काय काय चाकरी केली असेल ते एक श्री जाणें. कोणे गोष्टीस अंतर पडिलें नाहीं. आम्ही ऐसे सेवक नव्हे जे, स्वामीचें स्मरण न करितां आधीं आपला बहुमान घेऊन याचा पर्याय कागदी काय ह्मणऊन लिहावा ? भेटी अंतीं कळों येईल " तुह्मीं आपलें स्मरण राजश्रीपाशी घेतलें नाही परंतु अल्लीमर्दाखान घेतला ह्मणऊन ऐकिलें विजयी वस्त्रें पाठविलीं " ह्मणऊन लिहिलें त्यावरून अपूर्व वाटलें । स्वामी वडील. हें यश येतें तें स्वामींचेच पुण्येकडून येतें आमचा अभिमान सर्व गोष्टीचा स्वामीस पूर्वीपासूनहि आह्मांस स्वामीनेंच गौरविलें तेथें वस्त्राचेंच कार्य ह्मणऊन आह्मीं ल्याहावें ? पूर्वीपासूनहि आह्मांस स्वामीनेंच गौरविलें तेथें वस्त्राचेंच कार्य ह्मणऊन आह्मीं ल्याहावें? पूर्वीपासून अगीकार आमचा स्वामींनी केला आणि बंधू ह्मणविलें. तोच सिद्धी पाविला पाहिजे वरकड बिस्तारे ल्याहावें तरी लिहिजेसारखा पदार्थ नाहीं राजश्री सेखोजी बरगे व बाजी शिदे मुखवचनें सांगतील तीं वचने आमचीच ऐसे जाणून, श्रीशिवनाथ देव कृष्णेपाशीं आहे, तेथें आपण आले पाहिजे आह्मीं येऊन स्वामीची आमची भेटी होऊन श्रीचे व कृष्णेचे साक्षीनसी बेल तुळशी होतील. मग जो विचार करणें तो केला जाईल स्वामीवितरिक्त आह्मी काही नाहीं. जैसी पूर्वी आज्ञेप्रमाणेंच वर्तणूक केली तैसीच करू कळले पाहिजे.
श्रीराजारामचरणीं विलसति
तत्पर । संताजी लेखनविधि
घोरपडे निरंतर.