[ २० ] १६७० - १६७१.
अज् रख्तखाने राजश्री जिजाआऊसाहेब दाइमदौलतह ता । मा । नारो त्रिमळ हुद्देदार व मोकद्दमानी व रयानी मौजे ( सेवका ) तर्फ खेडबरें मालूम दानद सु ।। इहिदे सबैन अलफ. हरी गोविंद याचा इनाम मौजे मजकुरीं. चावर १ एक आहे कारकीर्दी दर कारकीर्दी भोगवटाबद्दल फर्मान चालत आलें आहे आपलेंहि कारकीर्दीस चालिलें आहे. चिरंजीवाचा कागद आहे. तरी तुह्मीं भोगवटा मनास आणून, राजश्री निळो सोनदेऊ याचे बाप सोनाजी नारायण येहीं इनाम कीर्दी करुन भोगवटा चालिला आहे. हें तुह्मी देशमुख व मोकदाम यांस लिहोन सालाबाद चाललेंत आलें आहे तैसें चालवणें. दरम्यान कितेक दिवस फितवतीकरितां भोगवटा जाला नसेल, त्याचा उजूर न करणें. सालाबाद भोगवटें प्रो। मनास आणून, राजश्री निळो सोनदेऊ यांचे दुमाले इनाम शेत चावर एक करुन चालवीत जाणें. उजूर न करणें. तुह्मीं तालीक लेहुनु घेऊनु अस्सली खुर्द खत मा । इलेपासीं फिरावून देणें पा । हूजूर चावर सदरहूचें थळ नायगावीचे शिवेचा पाणलोट नजीक पिंपरी शेतांत देही आंबे ठेवताती. आंबे आहे ते यांचे दुमाल करणें, आणि चालवीत जाणें.